LIVE STREAM

Uncategorized

जर्मनीमध्ये विविध प्रकारच्या क्षेत्रामध्ये होणार रोजगाराच्या संधी उपलब्ध – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई :- राज्यशासनाने कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी जर्मनीतील बाडेन वुटेनबर्ग राज्यासोबत करार केला आहे.या करारानुसार बाडेन वुटेनबर्ग येथे विविध प्रकारच्या क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. नोकरीसाठी आवश्यक असलेल्या प्रशिक्षणावर भर देण्यात येणार आहे असे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.

जर्मनीतील बाडेन वुटेनबर्ग येथील शिक्षण क्षेत्रातील तज्ञ शिष्टमंडळ दि.१६ ते २२ मार्च या कालावधीत महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून राज्य नाविन्यता सोसायटी येथे त्यांनी भेट दिली. यावेळी कौशल्य विकास मंत्री श्री.लोढा बोलत होते. जर्मनीतील बाडेन वुटेनबर्ग येथील श्री.कोनार्ड नेफु यांच्या नेतृत्वात फ्लोरीयन लेपोर्ड, ज्योहेन मान, अँडरेज हॉर्नार, बेटे वाग्नेर हे शिष्टमंडळात उपस्थित होते. यावेळी कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंग देओल,राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार, कौशल्य विकास विभागाचे आयुक्त नितीन पाटील, व्यवसाय व प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालक माधवी सरदेशमुख आणि महाराष्ट्र रतन टाटा कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर यावेळी उपस्थित होत्या.

कौशल्य विकास मंत्री श्री.लोढा म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भारताला जागतिक महासत्ता बनण्याच्या दिशेने पुढे घेऊन जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात या धोरणाला गती देण्यात येत आहे. जर्मनीतील सर्वात प्रगत बाडेन-वूटेनबर्ग राज्यासोबत करार करून मराठी होतकरू तरुणांना परदेशात नोकरीची सुवर्ण संधी प्राप्त होण्यासाठी राज्य शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. केवळ रोजगाराचा नाही तर त्या रोजगारासाठी कौशल्य प्रशिक्षण आणि जर्मन भाषेचे ज्ञान देण्याचा अभिनव उपक्रमही सुरु केला आहे. एकूणच जगभरात विविध उद्योग व्यवसायांना जाणवणारी मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता महाराष्ट्रातील प्रशिक्षण संस्थांमध्ये जर्मनीतील आवश्यक कौशल्याची भर घालण्याच्या दृष्टीने बाडेन-वूटॅमबर्गच्या राज्याशी झालेल्या कराराला अधिक गती देण्याची कार्यवाही सुरु आहे असेही ते म्हणाले.

जर्मनीतील बाडेन वुटेनबर्ग येथील शिक्षण क्षेत्रातील तज्ञ शिष्टमंडळ दि.१६ ते २२ मार्च या कालावधीत महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून यादरम्यान ते विविध व्यावसायिक आणि औद्योगिक प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांना भेटी देत आहेत. या भेटीदरम्यान राज्यात विविध संस्थांमध्ये सुरु असलेले कौशल्य प्रशिक्षण आणि जर्मनीत आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ यावर चर्चा झाली

महाराष्ट्रतील शिक्षण पद्धतीची माहिती शिष्टमंडळाला होईल : अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा

राज्य शासनाने कुशल मनुष्यबळ पुरवण्यासाठी जर्मनीतील बाडेन वुटेनबर्ग राज्याशी करणार केला आहे. जर्मन शिष्टमंडळाने राज्यभरातील विविध कौशल्य विभागाच्या प्रशिक्षण संस्थांना भेट दिली आहे. महाराष्ट्र आणि बाडेन वुटेनबर्ग या दोन्ही राज्यातील शिक्षण पद्धती कुशल मनुष्यबळासाठी आवश्यकता या बाबींची या भेटीतून माहिती होईल. जर्मन शिष्टमंडळाने छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी शासकीय प्रशिक्षण संस्था तसेच कृषी कौशल्य विकास केंद्रालाही भेट दिली. मुंबई मधील चुनाभट्टी येथील महत्वपूर्ण राष्ट्रीय कौशल्य विकास केंद्र तसेच पुणे येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाना भेट देऊन या शिष्टमंडळाने शिक्षक तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधून तेथील अभ्यासक्रमाची माहिती घेतली.

कौशल्य विकास विभागाची रचना आणि शिक्षण पद्धती जाणून घेणे शिष्टमंडळाचे उद्दिष्ट – श्री.कोनार्ड नेफु

महाराष्ट्रातील कौशल्य विकास विभागाची रचना आणि शिक्षण पद्धती जाणून घेणे हे या शिष्टमंडळाचे उद्दिष्ट असल्याचे मत जर्मनीतील बाडेन वुटेनबर्ग येथील श्री.कोनार्ड नेफु यांनी व्यक्त केले. शिक्षण क्षेत्रातील तज्ञ शिष्टमंडळ १६ ते २२ मार्च या कालावधीत महाराष्ट्रातील विविध व्यावसायिक आणि औद्योगिक प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांना भेटी देत आहेत तसेच येथील शिक्षण क्षेत्रातील माहिती जाणून घेत आहेत.

कौशल्य विकास विभागामार्फत राज्यभरात सुरू असलेल्या विविध संस्था व त्यांचे प्रशिक्षण व उपक्रमांची माहिती यावेळी कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा यांनी सादरीकरणातून दिली. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांनी शिक्षण विभागातर्फे सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती सादरीकरणातून दिली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!