जागतिक महिला दिनी आचार्य पदवीप्राप्त डॉ.मंजुषा बारबुध्दे यांचा सत्कार

अमरावती :- कोरोना काळात बाधित रुणांचे आभासी पद्धतीने समुपदेशन करतांना अनेक अडचणी निर्माण झाल्या, परंतु या काळात संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील आजीवन अध्ययन विभागांतर्गत येणा-या समुपदेशन व मानसशास्त्राच्या शिक्षिका डॉ. मंजुषा बारबुध्दे (चौधरी) यांनी जो भीती, मृत्यू आणि मानसिक अस्वस्थतेचा अनुभव घेतला, त्याची प्रेरणा घेऊन मानसशास्त्राच्या विद्यार्थिनी कु. मंजुषा बारबुध्दे यांनी या विषयावरच आचार्य पदवी प्राप्त करण्याचा प्रण करुन त्यांनी “कोरोना संक्रमित रुग्णांचे मानसिक स्वास्थ्य, ताण आणि मृत्यूच्या भीतीचे मापन” या विषयात आचार्य पदवी प्राप्त केली. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून डॉ. मंजुषा बारबुध्दे यांचा कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील, व्य.प. सदस्य डॉ. मनीषा कोडापे, आंतरविद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. वैशाली गुडधे, बिजभाषक डॉ. अलका गायकवाड आदी विचारपीठावर उपस्थित होते.
कोरोना हा मानवी जीवनात दहशतीचे वातावरण निर्माण करणारा ठरला. भविष्यात अशा प्रकारचे संक्रमण निर्माण झाले तर या भीतीतून काढण्यासाठी डॉ. मंजुषा बारबुध्दे यांचा विषय अतिशय महत्त्वाचा ठरतो. प्रत्येक अभ्यासक्रमाच्या प्राध्यापकांनी आपल्या भावी जीवनात अशाच प्रकारचे यश संपादन करीत आपल्या वैचारिक संपन्नतेचा आलेख चढत ठेवला पाहिजे असे आवाहन याप्रसंगी डॉ. श्रीकांत पाटील यांनी केले. यावेळी विद्यापीठातील विभाग प्रमुख, शिक्षक, अधिकारी, महिला कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.