LIVE STREAM

India NewsLatest NewsMaharashtra

न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सेन यांची नेव्हल डॉकयार्ड येथे भेट

मुंबई :- न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सेन आणि रॉयल न्यूझीलंड नेव्हीचे नौसेना प्रमुख रिअल ॲडमिरल गारिन गोल्डिंग यांनी भारतीय नौदलाच्या नवीनतम स्वदेशी विनाशिका आयएनएस सुरत ला नेव्हल डॉकयार्ड, मुंबई येथे भेट दिली. पश्चिमी नौदल कमांडचे ध्वज अधिकारी कमांडिंग-इन-चीफ व्हाइस अॅडमिरल संजय जे. सिंग यांनी पंतप्रधान लक्सेन यांचे जहाजावर स्वागत केले.

या भेटीदरम्यान आयएनएस सुरत च्या अत्याधुनिक डिझाइन, प्रगत तंत्रज्ञान आणि सामरिक क्षमतांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच, राष्ट्रीय सागरी सुरक्षेतील या युद्धनौकेच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा आढावा घेण्यात आला. आयएनएस सुरत ही भारतीय नौदलाची नवीनतम क्षेपणास्त्र विनाशिका असून १५ जानेवारी २०२५ रोजी नौदलात समाविष्ट झाली आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स, मुंबई यांनी या युद्धनौकेची निर्मिती केली असून भारतीय नौदलाच्या वॉरशिप डिझाइन ब्युरोने तिची रचना विकसित केली आहे. या जहाजात ७५ टक्के पेक्षा जास्त स्वदेशी सामग्रीचा समावेश असून, ही ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेचा उत्तम नमुना असल्याची माहिती यावेळी पंतप्रधान लक्सेन आणि त्यांच्या शिष्टमंडळाला देण्यात आली.

यानंतर रिअल ॲडमिरल गारिन गोल्डिंग यांनी व्हाईस ॲडमिरल संजय जे. सिंग यांची सदिच्छा भेट घेऊन द्विपक्षीय नौदल सहकार्य आणि धोरणात्मक संबंधांवर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी नेव्हल डॉकयार्डच्या हेरिटेज हॉलला भेट देऊन ‘एचएमएनझेडएस ते काहा’ च्या एप्रिल २०२५ मधील नियोजित भेटीकरिता तांत्रिक सहाय्याबाबत चर्चा केली. याशिवाय, अॅडमिरल गोल्डिंग यांनी नेव्हल डॉकयार्ड, मुंबई येथील ‘गौरव स्तंभ’ येथे पुष्पचक्र अर्पण करून राष्ट्रसेवेसाठी सर्वोच्च बलिदान दिलेल्या विरांना श्रद्धांजली वाहिली.

या दौऱ्याच्या अनुषंगाने नौदल सहकार्य वाढवण्यासाठी तसेच द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये क्रॉस-डेक भेटी, क्रीडा स्पर्धा आणि सामाजिक कार्यक्रम यांचा समावेश आहे. ‘एचएमएनझेडएस ते काहा’ HMNZS Te Kaha जहाज निघण्यापूर्वी भारतीय नौदलासोबत मेरीटाइम पार्टनरशिप एक्सरसाईज पार पडणार आहे. या सागरी युद्धाभ्यासामुळे नौदल संचालनामधील समन्वय अधिक वृद्धिंगत होईल आणि सागरी सहकार्याची सामूहिक बांधिलकी अधोरेखित केली जाईल.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!