समाजातील विविध समस्यांवर राज्यस्तरीय अधिवेशनात विचारमंथन व्हावे – डॉ. साळोक
अमरावती :- समाजात अऩेक समस्या आहेत, त्या समस्या सोडविण्याकरिता त्यावर विचारमंथन व्हावे आणि त्यावर उपाययोजना केल्या जाव्यात, यासाठी राज्यस्तरीय अधिवेशन मैलाचा दगड ठरेल, असे प्रतिपादन महाराष्ट्राच्या मराठी समाजशास्त्र परिषदेचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मण साळोक यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील समाजशास्त्र विभाग आणि विदर्भ मराठी समाजशास्त्र परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भारतीय समाज : प्रश्न आणि आव्हाने या विषयावर पंधराव्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, प्रमुख अतिथी म्हणून मानवविज्ञान विद्याशाखा व मराठी विभाग प्रमुख डॉ. मोना चिमोटे, बीजभाषक लातूर येथील ज्येष्ठ प्राध्यापक समाजशास्त्र व विचारवंत डॉ. सुरेश वाघमारे, विदर्भ मराठी समाजशास्त्र परिषदेचे अध्यक्ष डॉ. बी.एम. क-हाडे, विद्यापीठाच्या समाजशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी.एच. किर्दक, नागपूर विद्यापीठातील समाजशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रदीप मेश्राम, विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. के.बी. नायक, समाजशास्त्र विभागाचे डॉ. किशोर राऊत, विदर्भ मराठी समाजशास्त्र परिषदेचे सचिव डॉ. रवींद्र विखार उपस्थित होते.
अधिवेशनाचे उद्घाटन झाल्याची घोषणा करीत डॉ. साळोक म्हणाले, आधुनिक समाज गुंतागुंतीचा होत चालला आहे. अनेक समस्या आहेत. शेतक-यांच्या आत्महत्येत वाढ होत आहे, विद्यार्थी मोठ¬ा प्रमाणावर आत्महत्या करीत आहेत, वृध्दांच्या समस्या, आरोग्याच्या समस्या यांसह अनेक समस्या समाजासमोर आहेत. त्या समस्यांवर चर्चा व्हावी, विचारमंथन व्हावे, याकरिता अधिवेशनात बेरोजगारी, वंचित घटक, नवीन आर्थिक धोरण, त्याचा ग्रामीण कृषी समाजावर पडलेला प्रभाव, आदिवासींची सध्यस्थिती आणि आव्हाने, महिलांवर होणारे अत्याचार आदी विषयांवर वेगवेगळे परिसंवाद व शोधिनिबंध सादर होऊन या अधिवेशनातून उपाययोजना सांगणारे दस्तावेज तयार होतील, असे ते म्हणाले. प्रमुख अतिथी डॉ. मोना चिमोटे म्हणाल्या, अधिवेशनात चार मुख्य समस्यांसह पंधरा विविध समस्यांवर विचारमंथन होणार आहे. नवीन मूल्य व्यवस्थेचे समाजावर होणा-या परिणामांवर देखील चर्चा व्हायला हवी. एक चांगली सामाजिक व्यवस्था आपण कशी देवू शकू या अऩुषंगाने परिषदेच्या माध्यमातून निघालेले निष्कर्ष विविध सामाजिक संस्था आणि राजकीय नेतृत्वापर्यंत पोहचविल्या जातील, त्या समस्या सुटतील, त्या दृष्टीने हे अधिवेशन यशस्वी होईल, असेही त्या म्हणाल्या.
बीजभाषण करतांना डॉ. सुरेश वाघमारे म्हणाले, महाराष्ट्रात स्त्रियांना सन्मान देण्याचे कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केले, शिक्षणाचे कार्य फुले दाम्पत्यांनी केले आणि स्त्रीला राष्ट्रपती, पंतप्रधान करण्याचे कार्य डॉ. बाबासाहेबांच्या संविधानाने केले. विदर्भात शेतक-यांच्या आत्महत्या मोठ¬ा प्रमाणावर होत आहे आणि आपला देश कृषीप्रधान म्हणून सांगतो, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षानंतरही जातीभेद, महिलांवरील अत्याचार, बेरोजगारी, अंधश्रध्देचा कळस, उच्चभेद यांसह अनेक सामाजिक समस्या कायम आहेत. या समस्यांवर संशोधन व्हावे, त्यावर उपाययोजना करण्याकरीता निष्कर्ष निघावेत आणि त्याचे संकलन शासन व सामाजिक संस्थांना पाठविले जावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तरुण संशोधकांनी पुढे येवून सामाजिक समस्या सोडविण्याकरीता हातभार लावावा यावरही त्यांनी भर दिला. डॉ. बी.एम. कु-हाडे म्हणाले, विविध सामाजिक समस्यांवरील विषयांवर विदर्भ मराठी समाजशास्त्र परिषदेच्यावतीने अशा प्रकारचे कार्यक्रम घेतल्या जातात. सामाजिक प्रश्नांवर लक्ष केंद्रीत केल्या जाते आणि सामाजिक प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केल्या जातो.
अध्यक्षीय भाषणात प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे म्हणाले, उत्कृष्ट परिषदेचे आयोजन होत आहे. अधिवेशनातील विविध विषयांवर वक्त्यांनी आपले विचार मांडले. विविध सत्रांमध्ये सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली जाणार आहे. भारतीय समाजापुढे असलेल्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी परिषदेच्या माध्यमातून अहवाल तयार होऊन शासनकत्र्यांपर्यंत पाठविल्या जाईल, असे त्यांनी सांगितले. पुरस्कार प्रदान
अधिवेशनामध्ये समाजशास्त्र भूषण पुरस्कार विदर्भ मराठी समाजशास्त्र परिषदेचे अध्यक्ष डॉ. बी.एम. कु-हाडे यांना, उत्कृष्ट ग्रंथलेखन पुरस्कार डॉ. सुरेश डोहणे, योगाचार्य पुरस्कार सौ. ज्योती किशोर राऊत यांना, तर उत्कृष्ट योगाचार्य शिक्षक पुरस्कार डॉ. अनिता भीमराव वाघमारे यांना प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे यांच्या हस्ते ससन्मान प्रदान करण्यात आला.
गीताने सुरुवात झालेल्या कार्यक्रमामध्ये संत गाडगे बाबा व समाजशास्त्रज्ञ ऑगस्ट, कॉम्स यांचे प्रतिमापूजन, दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. बी.एम. क-हाडे व डॉ. किशोर राऊत लिखित ‘महाराष्ट्रातील प्रमुख जमाती’ आणि डॉ. रवींद्र लिखार लिखित ‘वैज्ञानिक दृष्टिकोनाचा चिकित्सक अभ्यास’ या पुस्तकाचे तसेच अधिवेशनाच्या स्मरणिकेचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. प्रास्ताविक डॉ. किशोर राऊत, तर आभार भाग्यश्री आठवले हिने मानले. कार्यक्रमाला महाराष्ट्रातील विदर्भ मराठी समाजशास्त्र परिषदेचे सदस्य, विविध विद्यापीठामधील समाजशास्त्राचे शिक्षक, विद्यार्थी मोठ¬ा संख्येने उपस्थित होते.