नितीन गडकरी यांना डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार | समाजकारणावर खणखणीत भाष्य |
अमरावती :- अमरावतीत श्री शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार 2024 चं आयोजन करण्यात आलं.या विशेष कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उपस्थिती दर्शवली आणि महत्त्वपूर्ण भाषण करत समाजकारणाबाबत आपले विचार मांडले. चला, पाहूया या कार्यक्रमाचा सविस्तर अहवाल.
शनिवार, 22 मार्च रोजी अमरावतीतील श्री शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे प्रतिष्ठित डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार 2024 चं वितरण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं. या वेळी नितीन गडकरी यांचे संस्थेच्या वतीने शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन जंगी स्वागत करण्यात आलं.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपल्या भाषणात गडकरी यांनी राजकारण आणि समाजकारण याविषयी महत्त्वाचे विचार मांडले. ते म्हणाले, “राजकारण हे समाजकारणासाठी असते. केवळ पक्षाचे पोस्टर लावणे म्हणजे राजकारण नाही. समाजातील मुख्य गरजा ओळखून त्यावर काम करणे हे खरे लोकशाहीचे उद्दिष्ट आहे. तसेच त्यांनी जातीयतेवर भाष्य करताना सांगितले की, “जनता कधीच जातिवादी नसते. मात्र, काही राजकारणी आपले राजकारण साधण्यासाठी जातीभेदाचा वापर करतात. मी कधीच जातीचे राजकारण केले नाही, कारण समाजाला जोडण्याचे काम हेच खरे नेतृत्व असते.
या कार्यक्रमाला खासदार बळवंत वानखडे, खासदार अनिल बोंडे, विधान परीषद आमदार संजय खोडके, आमदार सुलभा खोडके, माजी मंत्री प्रवीण पोटे, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
गडकरी यांनी केलेलं भाषण समाजासाठी एक प्रेरणादायी संदेश आहे. राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देत त्यांनी दिलेल्या विचारांना उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. पुढील अपडेटसाठी सिटी न्यूजसोबत जोडलेले राहा. धन्यवाद!