ई-शिवनेरी बस चालक मोबाईलवर मॅच पाहत असताना कारवाई, बडतर्फ आणि कंपनीवर 5000 रुपयांचा दंड

मुंबई :- बस चालवत मोबाईलवर क्रिकेट मॅच बघणाऱ्या खासगी चालकाला एसटी प्रशासनाने बडतर्फ केले असून संबंधित खाजगी कंपनीला पाच हजार रुपये इतका दंड ठोठावला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार एसटी महामंडळाने ही कारवाई केली.
दादर येथून स्वारगेट (पुणे) साठी निघालेल्या खासगी ई-शिवनेरी बसमधील चालक 21 मार्च रोजी रात्री लोणावळा जवळ बस चालवत क्रिकेट मॅच पाहत होता. त्याचे चित्रीकरण संबंधित बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पाठवले. याबाबत मंत्री सरनाईक यांनी तातडीने एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना नियमानुसार कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले.
एसटीच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी संबंधित खासगी संस्थेच्या चालकास प्रवाशांचा जीव धोक्यात घालून बेशिस्त वाहनं चालवल्या प्रकरणी बडतर्फ केले. तसेच संबंधित खाजगी संस्थेला 5000 रुपयांचा दंड ठोठावला आहे.
यावेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की, ई-शिवनेरी ही एसटीची मुंबई -पुणे मार्गावर धावणारी प्रतिष्ठित बस सेवा आहे. या बसमधून अनेक सन्माननीय व्यक्ती प्रवास करीत असतात. अपघातविरहित सेवा हा या बस सेवेचा नावलौकिक आहे. त्यामुळे अशा प्रकारे बेशिस्त वाहन चालवून प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या चालकांच्यावर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रवाशांचा एसटीच्या या प्रतिष्ठित सेवेबद्दल विश्वास दृढ होत जाईल.
तसेच भविष्यात एसटीकडे असलेल्या खासगी बसच्या चालकांना संबंधित संस्थेकडून वेळोवेळी शिस्तबद्ध वाहन चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली.
22 मे पर्यंत इलेक्ट्रिक बस पुरवण्याचे आदेश
ईव्ही ट्रान्स कंपनीला इलेक्ट्रीक बस पुरवठ्याचे कंत्राट रद्द करण्याचा एसटी महामंडळाने इशारा दिला आहे. करारानुसार बस पुरवठा होत नसल्याने कंत्राट रद्द करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 22 मे 2025 पर्यंत 1 हजार 287 ईव्ही बस पुरवण्याचा आदेश दिला असून त्याचे उल्लंघन झाल्यास कंत्राट रद्द करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
महामंडळ आणि कंपनीमध्ये 2 वर्षांत 5 हजार 150 बस पुरवठ्याचा करार करण्यात आला आहे. या करारानुसार महिन्याला 215 बस महामंडळास देणं अपेक्षित आहे. जानेवारी 2025 पर्यंत ईव्ही ट्रान्सकडून 1 हजार 935 बस येणं अपेक्षित होतं. पण गेल्या सहा महिन्यांत एकही गाडी एसटीच्या ताफ्यात दाखल नाही. त्यानंतर आता एसटी महामंडळाने कंपनीला कडक शब्दात इशारा दिला आहे.