प्रसूती व स्त्रीरोग सोसायटीचा अमरावतीत भव्य पदग्रहण सोहळा | नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सन्मान

अमरावती :- अमरावतीत आज प्रसूती व स्त्रीरोग सोसायटीचा भव्य पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. हॉटेल महफिल येथे आयोजित या सोहळ्यात अनेक मान्यवर डॉक्टरांनी हजेरी लावली. सोसायटीच्या माजी सचिवांनी आपल्या कार्यकाळातील उल्लेखनीय कामगिरी सादर केली. चला, पाहूया या सोहळ्याचा संपूर्ण वृत्तांत.
अमरावतीतील प्रसूती व स्त्रीरोग सोसायटीचा भव्य पदग्रहण सोहळा रविवारी हॉटेल महफिल येथे मोठ्या आनंदात संपन्न झाला. सोसायटीच्या माजी सचिव डॉ. मोनाली ढोके यांनी आपल्या कार्यकाळातील विविध उपक्रम आणि सामाजिक कार्यांची सविस्तर माहिती दिली. शिबिरे, सांस्कृतिक कार्यक्रम आणि आरोग्य जनजागृती उपक्रम यासह समाजोपयोगी उपक्रमांची त्यांनी स्क्रीनद्वारे आकर्षक सादरीकरण केले. सोसायटीच्या कार्याची उपस्थित डॉक्टरांनी भरभरून प्रशंसा केली. यावेळी मान्यवर म्हणून डॉ. किरण कुर्तकोटी, डॉ. पराग बिनीवाले, डॉ. लक्ष्मी श्रीखंडे, डॉ. राजश्री भासले, डॉ. प्रांजल शर्मा आणि डॉ. सोनाली देशमुख उपस्थित होते.
कार्यक्रमात डॉ. सोनाली देशमुख यांचा विशेष सन्मान करण्यात आला. मोमेंटो, शाल आणि श्रीफळ देऊन त्यांना गौरवण्यात आले. यानंतर डॉ. किरण कुर्तकोटी यांच्या हस्ते नवनियुक्त अध्यक्ष, सचिव आणि कार्यकारिणी सदस्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी माजी अध्यक्ष डॉ. रश्मी खार आणि माजी सचिव डॉ. मोनाली ढोके यांनी आपला पदभार नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना सोपवला. सर्व उपस्थित मान्यवर आणि डॉक्टरांनी नव्या कार्यकारिणीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
प्रसूती व स्त्रीरोग सोसायटीचा हा उत्साही पदग्रहण सोहळा अमरावतीतल्या वैद्यकीय क्षेत्रात एक संस्मरणीय क्षण ठरला. नव्या कार्यकारिणीला आमच्याकडूनही हार्दिक शुभेच्छा!