महाराष्ट्रातही सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नवीन कायदा आणि प्राधिकरण तयार करणार

त्र्यंबकेश्वर :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज नाशिक येथे 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाबाबत आढावा बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमक्ष जिल्हाधिकाऱ्यांनी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर विकास आराखड्याचे सादरीकरण केले.
बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त नाशिकच्या विकासासोबतच श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरचाही विकास होणे आवश्यक आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व मोठे आहे. देशभरातून लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. म्हणूनच जवळपास ₹1100 कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. याचे दोन टप्पे आहेत. पहिला टप्पा सिंहस्थापर्यंत पूर्ण होईल, तर दुसऱ्या टप्प्यातील कामे त्यानंतरही सुरू राहतील. याअंतर्गत दर्शनासाठी कॉरिडॉर, पार्किंग व्यवस्था, शौचालये तसेच सर्व तीर्थकुंड आणि प्रमुख मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यात येईल. विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच, ब्रह्मगिरी परिसराच्या नैसर्गिक सौंदर्याला साजेसे नॅचरल ट्रेल्स विकसित करण्याबाबत आराखड्यात समाविष्ट आहेत. तसेच महाराष्ट्रही उत्तर प्रदेशच्या धर्तीवर कुंभमेळा कायदा आणि मेळा प्राधिकरण तयार करणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, नाशिकमध्ये लवकरच सुमारे 11 पुलांचे बांधकाम सुरू होणार आहे. तसेच, रस्त्यांचे जाळे आणि घाटांच्या विकासाचे कामही वेगाने सुरू आहे. साधुग्रामसाठी जागा अधिग्रहित करून त्याचा विकास केला जात आहे. तसेच, एसटीपीचे जाळे उभारून पाणी शुद्ध राहील याची खबरदारी घेतली जात आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याचा सरकारचा मानस आहे. या सर्व कामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता असून, त्यात कोणतीही कमतरता भासू देणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. यावेळी मंत्री गिरीष महाजन, मंत्री दादा भुसे, जिल्हाधिकारी आणि इतर अधिकारी उपस्थित होते.