मेळघाट रंगोत्सवात पथनाट्य, लोकनृत्य, एकांकिकांमधून जनजागृती नागरिकांनी घेतला शासकीय सुविधांचा लाभ
अमरावती :- जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणी यांच्या वतीने चिखलदरा येथे आज ‘मेळघाट रंगोत्सव 2025’ उत्साहात पार पडला. या महोत्सवात स्थानिक कलाकारांनी पथनाट्य, लोकनृत्य आणि एकांकिकांमधून उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन जनजागृती केली. तसेच नागरिकांनी शासकीय सुविधांचा लाभ घेतला.
यावेळी आमदार केवलराम काळे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र, धारणीच्या उपविभागीय अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, तहसीलदार जीवन मोरनकर, गटविकास अधिकारी शिवशंकर भारसाकळे आदी उपस्थित होते.
महोत्सवात लोकनृत्य, पाककला, पारंपरिक वेशभूषा स्पर्धा घेण्यात आल्या. लोकनृत्य स्पर्धेत प्रथम बिजूधावडी, ता. धारणी, द्वितीय ढाकणा, ता. चिखलदरा, तृतीय बेरदाबला तर प्रोत्साहनपर भिरोजा, ता. चिखलदरा आणि कोयलारी, ता. चिखलदरा, वेशभूषा स्पर्धेत प्रथम साबुलाल दहीकर आणि गीता दहीकर, रा. मोथा, द्वितीय सरिता मावसकर, रा. धारणी, तृतीय अनुसया पराते, रा. धोतरखेडा, पाककला स्पर्धेत प्रथम जासमू कासदेकर, रा. आळनदी, द्वितीय सुमन कासदेकर आणि प्रमिला कंदिलवार, तृतीय नगाय चिमोटे यांना स्मृतीचिन्ह आणि रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
नागरिकांसाठी आधार अपडेट, ऍग्रीस्टॅक नोंदणी, रेशनकार्ड नोंदणी, गोल्डन कार्ड नोंदणी, आरोग्य तपासणी, विनाशुल्क मौखिक तपासणी, पर्यटन विभाग, तहसील कार्यालयाच्या सेवा आणि पोस्ट ऑफिस व बँक खाते उघडण्याची सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली. नागरिकांनी या सुविधांचा लाभ घेतला.