फहीम खानच्या घरावर मनपाची मोठी कारवाई

नागपूर :- नागपूर दंगलीचा मास्टरमाईंड फहीम खान विरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. महानगर पालिकेकडून त्याच्या अनधिकृत बांधकामावर बुलडोझर चालवण्यात आला. काय आहे संपूर्ण प्रकरण आणि यामागील पार्श्वभूमी.
पाहूया या खास रिपोर्टमध्ये :
नागपूरच्या टेकानाका परिसरात राहणाऱ्या फहीम खानच्या घरावर आज सकाळी 10 वाजता नागपूर महानगर पालिकेने कारवाई सुरू केली. महानगर पालिकेच्या नोटीसनंतर 24 तासांच्या आत ही कारवाई करण्यात आली.
मनपा प्रशासनाने सांगितले की, घराचा काही भाग अनधिकृत पद्धतीने अतिक्रमण करून वाढवण्यात आला होता.स्थानिक पोलीस आणि SRPF च्या दोन तुकड्या मोठ्या संख्येने तैनात होत्या, जेणेकरून कायदा आणि सुव्यवस्था राखली जाऊ शकते.घरासमोर असलेले टीनचे शेड आणि वॉल कंपाऊंड देखील जमीनदोस्त करण्यात आले.
सुरक्षा कारणास्तव परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला. जेसीबी आणि पोकलँड मशीनच्या मदतीने बुलडोझरने घरावर कारवाई सुरू करण्यात आली. यशोधरानगर परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. स्थानिक रहिवाशांमध्ये ही कारवाई चर्चेचा विषय बनली आहे. फहीम खानविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल असून, सध्या तो पोलीस कोठडीत आहे.