मुंबईत विद्याविहारमध्ये भीषण आग: सुरक्षा कर्मचाऱ्याचा होरपळून मृत्यू, एक जण गंभीर जखमी

मुंबई :- मुंबईतील विद्याविहार स्थानकाजवळील इमारतीला भल्या पहाटे आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीमध्ये एका सुरक्षा कर्मचाऱ्याचा होरपळून मृत्यू झाला, तर दुसरा कर्मचारी गंभीर भाजला आहे. साखर झोपेत असताना पहाटे साडेचार वाजता आगीची घटना घडल्याचे सांगण्यात आलेय. या घटनेनंतर विद्याविहार स्थानक परिसरात एकच खळबळ उडाली.
विद्याविहार स्थानकाजवळील तक्षशिला (निलकंट कॉम्पेलेक्सजवळील) इमारतीला भीषण आग लागली. पहाटे ४ वाजून ३५ मिनिटांनी आग लागल्याचे अग्निशामन दलाने सांगितलेय. या आगीत एकाचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर एकजण ३० टक्के भाजला आहे, त्याच्यावर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहे. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून कुलिंगचे काम सुरू आहे.
विद्याविहार स्थानकाजवळ आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामन दल तात्काळ दाखल झाले. आगीवर निंयत्रण मिळवण्यासाठी अग्निशामन दलाकडून प्रयत्न करण्यात आले. दोन ते तीन तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. या आगीमध्ये सुरक्षा कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. एकावर राजावाडी रूग्णालयात उपचार सुरू आहे. मृत झालेल्या सुरक्षा कर्मचाऱ्याचे उदय गगण असे आहे, तर जखमी कर्मचाऱ्याचे नाव संभाजीत यादव असे आहे.
शॉर्ट सर्किटमुळे इमारतीला आग लागली. पण त्यानंतर इमारतीमधील फर्निचर, एसी, कपडे, शू रॅकेट अन् इतर साहित्यामुळे आग अधिकच भडकली. तक्षशिला इमारातीचे दोन मजल्यावर आग पसरली होती. ही १३ मजली इमारत आहे, यातील पहिल्या दोन मजल्यावर आग भडकली होती. आग अधिकच भडकण्याआधी अग्निशामन दलाने त्यावर नियंत्रण मिळवले. यादरम्यान २० जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. किरकोळ जखमी झालेल्यांना राजावाडी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.