विद्यापीठात डिजिटल लायब्ररी निर्मितीवर 25 व 26 मार्च रोजी राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन

अमरावती :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा ग्रंथालय आणि माहितीशास्त्र विभाग आणि यूजीसी – मालवीय मिशन शिक्षक प्रशिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ” डी-स्पेस वापरून डिजिटल लायब्ररी निर्मिती ” या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा 25 आणि 26 मार्च 2025 रोजी विद्यापीठाच्या ज्ञानस्रोत केंद्रातील सेमिनार हॉलमध्ये आयोजित केली आहे. कार्यशाळेचे उद्दिष्ट डिजिटल लायब्ररी निर्मितीसाठी आवश्यक असलेली कौशल्ये आणि ज्ञान सहभागींना प्रदान करणे आहे. यामध्ये डी-स्पेस सॉफ्टवेअरचा वापर करून डिजिटल लायब्ररी कशी तयार करावी, व्यवस्थापित करावी आणि तिचे जतन कसे करावे, याबद्दल कार्यशाळेत मार्गदर्शन केले जाईल.
कार्यशाळेला प्रमुख अतिथी म्हणून कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे व कुलसचिव डॉ. अविनाश असनारे उपस्थित राहणार आहेत. कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी इच्छुक असलेल्या व्यक्तींनी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन ग्रंथालय आणि माहितीशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. वैशाली गुडधे आणि यूजीसी -एमएमटीटीसीचे संचालक डॉ. मोहम्मद अतिक यांनी विद्यापीठाच्यावतीने केले आहे.