शासकीय वसतीगृहातील भोजन , स्वच्छता व कर्मचारी आदी सर्व सुविधांसंदर्भात उपयुक्त धोरण तयार करण्याची गरज-आ.संजय खोडके
मुंबई :- महाराष्ट्र विधान परिषदेवर निर्वाचित होताच आ.संजय खोडके हे विधीमंडळाच्या कामकाजात सक्रिय झाले असून अनेक लक्षवेधीच्या माध्यमातून त्यांनी आपल्या प्रदीर्घ अनुभवाचा परिचय सभागृहाला करून दिला आहे. अशातच आज दिनांक २४ मार्च २०२५ रोजीच्या कामकाजात विधान परिषदेमध्ये शासकीय वसतीगृहातील सुविधा व सुधारणासंदर्भातील प्रश्नोत्तरादरम्यान आ.संजय खोडके यांनी शासकीय वसतीगृहातील भोजन,स्वच्छता व कर्मचारी आदी सर्व सुविधांसंदर्भात उपयुक्त धोरण तयार करण्याची गरज असल्याचे सांगितले. तसेच वसतीगृहात एका अधीक्षकाच्या अधिनस्त बाह्य स्वतंत्र कंत्राटाच्या माध्यमातून सेवा पुरविण्यासाठी शासनाने विचार करावा अशी मागणी सुद्धा करण्यात आली.
राज्यातील शासकीय वसतीगृहात कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने वसतीगृहातील कामकाज हे कंत्राटी पद्धतीने करण्यात येते . इतकेच नाही तर देखील देखभाल व दुरुस्ती, भोजन कंत्राट, स्वच्छता , सुरक्षा व्यवस्था ,अशी विविध कामे सुद्धा ही बाहेरील वेगवेगळ्या कंत्राटी संस्थाच्या माध्यमातून केली जातात. सर्वच कंत्राट हे वेगवेगळ्या बाह्य कंत्राटी यंत्रणेच्या माध्यमातून करण्यात येत असल्याने कामकाजात कुठेतरी अनियमितता व अडचणी निर्माण होत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. सद्या समाज कल्याण विभागात कर्मचारी भरती होत नसल्याने शासकीय वसतीगृहातील कामकाजासंदर्भात तक्रारी येणारच आहे. त्यामुळे शासकीय वसतीगृहातील सुधारणासंदर्भात एक उपयुक्त धोरण ठरविण्याची गरज असल्याची बाब आ.संजय खोडके यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. याकरिता शासकीय वसतीगृहातील कर्मचारी असो, अथवा भोजन व्यवस्था , स्वच्छता असो , की विद्यार्थी हिताच्या कुठल्याही उपाययोजना असो , यासाठी वेगवेगळे कंत्राट न देता सर्व सेवा ही एकाच बाह्य स्वतंत्र कंत्राटामार्फत पुरविण्याची लक्षवेधी सुद्धा आ.संजय खोडके यांनी केली. तसेच यासाठी शासनाकडून एक अधीक्षक नेमून त्यांचे अधिनस्थ इतर सर्व कामे कंत्राटी पद्धतीने करणे महत्वाचे असल्याने शासनाने या दृष्टीने विचार करून निश्चित धोरण ठरविण्याची मागणी आ.संजय खोडके यांनी केली.
यावर उत्तर देतांना राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री संजय सिरसाट यांनी सांगितले की सद्या शासकीय वसतीगृहांमध्ये ४० टक्के कर्मचारी कमी असल्याने नाईलाजास्तव बाह्य कंत्राटी यंत्रणेच्या माध्यमातून सेवा पुरविली जात आहे. यापुढे सुद्धा वसतीगृहात कुठलीही कमतरता भासणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाणार असल्याचे उत्तर मंत्रीमहोदयांच्या वतीने देण्यात आले.