साताऱ्यात धक्कादायक घटना: तरुणीने आईच्या मदतीने बॉयफ्रेंडची हत्या करून अपघाताचा बनाव केला

सातारा :- उसने घेतलेले पैसे परत मागिल्याचा राग आल्याने साताऱ्यात तरुणीने बॉयफ्रेंडची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बॉयफ्रेंडची हत्या करून तरुणीने अपघाताचा बनाव केला. आईच्या मदतीने तरुणीने बॉयफ्रेंडची हत्या केली आणि कारमध्ये बॉयफ्रेंडचा मृतदेह टाकून ती कार कालव्यामध्ये ढकलून दिली. याप्रकरणी दहिवडी पोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून चौघांना अटक केली. याप्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्यातील माण तालुक्यातील गोंदवले बुद्रुक गावामध्ये ही घटना घडली. योगेश पवार (२८ वर्षे) असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. योगेशची गर्लफ्रेंड रोशनी मानेने आई पार्वती मानेच्या मदतीने त्याची हत्या केली. रोशनी आणि तिच्या आईसह सात जण या हत्याप्रकरणात सहभागी आहे. या सातही जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी रोशनी, तिची आई पार्वती आणि दोन साथीदारांना अटक केली आहे. उर्वरीत आरोपींचा शोध सुरू आहे.
योगेश आणि रोशनीचे प्रेमसंबंध होते. योगेशने तिला लाखो रुपये उसने दिले होते. योगेशने रोशनीकडे पैसे परत मागितले. त्यामुळे संतापलेल्या रोशनीने १८ मार्च रोजी योगेशला नरवणे येथे बोलावून घेतले. त्याच ठिकाणी योगेशची धारदार शस्त्राने हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह स्विफ्ट कारमध्ये टाकून फडतरी येथील कॅनॉलमध्ये फेकला.
योगेशचा भाऊ तेजसने मंगळवारी संध्याकाळपासून भाऊ गायब असल्याची पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. कारसोबत योगेश गायब झाला होता. त्याचा फोनही बंद लागत होता. त्यामुळे घातपात झाल्याच्या संशयावरून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. त्याचे शेवटचे लोकेशन असलेल्या ठिकाणी पोलिसांनी धाव घेतली. त्याठिकाणी असलेल्या कॅनॉलमध्ये पोलिसांना योगेशची कार बुडाल्याचे आढळून आले. त्यांनी जेसीबीच्या सहाय्याने कार बाहेर काढली असता त्यामध्ये त्यांना योगेशचा मृतदेह आढळून आला.