अमरावतीत निःशुल्क जयपूर फूट शिबिर! दिव्यांगांसाठी ऐतिहासिक उपक्रम
अमरावती :- दिव्यांग बांधवांसाठी एक दिलासादायक बातमी! अमरावतीत रोटरी चॅरिटेबल ट्रस्टच्या पुढाकाराने आणि विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने आयोजित केल्या जात असलेल्या ‘जयपूर फूट शिबिरा’चा आज समारोप होत आहे. या शिबिराच्या माध्यमातून शेकडो दिव्यांगांना नवा आत्मविश्वास मिळाला आहे.
जयपूर फूट म्हणजे काय?
जयपूर फूट हा कृत्रिम पाय आहे, जो दिव्यांग व्यक्तींना चालण्यासाठी मदत करतो. कमी खर्चिक आणि प्रभावी असा हा पाय, विशेषतः अपघातग्रस्त आणि पोलिओग्रस्त लोकांसाठी वरदान ठरतो.
रोटरी चॅरिटेबल ट्रस्ट संचालित विचक्षणश्री आरोग्यधाम, ह्यूमॅनिटी फाउंडेशन आणि महावीर सेवा सदन यांच्या संयुक्त प्रयत्नातून हे शिबिर आयोजित करण्यात आलं. या शिबिराला गुरुवर्य श्री विचक्षणश्रीजी महाराज साहब आणि श्री मणिप्रभा श्रीजी महाराज साहब यांचे आशीर्वाद लाभले आहेत. या शिबिरात दिव्यांगांना मोफत जयपूर फूट बसवले जात आहेत. तसेच, त्यांना चालण्याचे प्रशिक्षण आणि आवश्यक वैद्यकीय सल्ला दिला जातो. शिबिराच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीचं उत्कृष्ट उदाहरण पाहायला मिळत आहे. स्थानिक प्रशासन, डॉक्टर आणि स्वयंसेवक हे सर्वजण या उपक्रमात तन-मन-धनानं सहभागी झाले आहेत.
२५ मार्च रोजी समारोप समारंभाला जिल्हाधिकारी सौरभ कटियार, भारतीय जैन संघटनेचे महासचिव सुदर्शनजी गांग, रोटरी प्रांत ३०३० चे प्रांतपाल राजिंदर सिंग खुराना, आणि अनेक प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.शिबिरातून लाभ घेतलेल्या अनेक दिव्यांगांनी आत्मविश्वासानं चालायला सुरुवात केली आहे. या उपक्रमामुळे त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडत आहे.
शिबिरात आतापर्यंत ५०० हून अधिक दिव्यांगांना लाभ मिळाला आहे. अनेक जण पहिल्यांदाच स्वतःच्या पायांवर चालताना दिसत आहेत. प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला स्वावलंबी बनवणे आणि त्यांना समाजात मुख्य प्रवाहात आणणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. शिबिरात कृत्रिम पाय मिळाल्यानंतर हसणाऱ्या चेहऱ्यांमधील आनंद शब्दांपलीकडचा आहे. अनेकांनी आनंदाश्रूंनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
अमरावतीत आयोजित जयपूर फूट शिबिर हे सामाजिक बांधिलकीचं उत्कृष्ट उदाहरण ठरलं आहे. दिव्यांग बांधवांना आत्मविश्वासानं उभं राहण्याची संधी मिळाली आहे. अशा प्रेरणादायी उपक्रमांसाठी सिटी न्यूज सदैव आपल्यासोबत आहे. आणखी अपडेट्ससाठी पाहत राहा सिटी न्यूज.