गो. से. महाविद्यालयात ‘जागतिक चिमणी दिवस’ उत्साहात साजरा
खामगांव :- विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ, द्वारा संचालित गो.से. महाविद्यालय,खामगांव येथील प्राणीशास्त्र विभागाद्वारे दिनांक १९ व २० मार्च २०२५ रोजी जागतिक चिमणी दिवसाचे औचित्य साधून ‘नेस्ट फ्रॉम वेस्ट’ आणि ‘एक मूठ धान्य पक्ष्यांसाठी’ या संकल्पनेवर आधारित दोन दिवासीय कार्यशाळेचे आयोजन महाविद्यामध्ये करण्यात आले होते . महाविद्यालयाचे उप-प्राचार्य डॉ. पी. व्ही. उबाळे अध्यक्षस्थानी होते , प्रमुख उपस्थितीमध्ये डॉ. ए. व्ही.पडघन, डॉ. एन.बी. कुटेमाटे, प्रमुख मार्गदर्शक प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. जी. बी. काळे, कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. सुहास पिढेकर सह-समन्वयक प्रा. मनोज बाभळे, हे उपस्थित होते. कार्यशाळेमध्ये महाविद्यालयातील बी.एससी.भाग १,२ व ३ चे सुमारे ७२ विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना प्राणिशास्त्र विभाग प्रमुख डॉ. जी. बी. काळे यांनी सांगितले की, आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून जागतिक चिमणी दिवस, वसुंधरा दिवस,जागतिक पाणथळ दिवस,व्याघ्र दिवस , वन्यजीव सप्ताह इत्यादी नानाविध प्रकारचे दिवस साजरे करीत असतो.पर्यावरण संवर्धन हा मुख्य हेतू हे दिवस साजरे करण्यामागचा आहे. २० मार्च हा ” जागतिक चिमणी दिवस” म्हणून संपूर्ण जगभर साजरा केला जातो. आमच्या विभागाद्वारे दरवर्षी जागतिक चिमणी दिन साजरा करण्यात येतो .विद्यार्थ्यांमध्ये निसर्ग पर्यावरण व वन्यजीव संरक्षण इ. बाबत जागृती व प्रेम निर्माण व्हावे म्हणून आज आपण महाविद्यालयाच्या परिक्षेत्रामध्ये विविध ठिकाणी पक्षी घरटे लावण्याचा उपक्रम हाती घेतलेला आहे.गेल्या काही वर्षांत शहरांमध्ये चिमण्यांच्या घटत्या संख्येबद्दल चिंता व्यक्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आधुनिक वास्तुकलेच्या बहुमजली इमारतींमध्ये चिमण्यांना जुन्या शैलीतील घरांप्रमाणे राहायला जागा मिळत नाही. सुपरमार्केट संस्कृतीमुळे जुनी किराणा दुकाने कमी होत चालली आहेत. त्यामुळे चिमण्यांना फेकलेली धान्ये मिळत नाहीत. याशिवाय मोबाईल टॉवरमधून निघणाऱ्या लहरी चिमण्यांच्या सामान्य जीवनासाठी हानिकारक मानल्या जातात. या लाटा चिमण्यांच्या मार्ग शोधण्याच्या पद्धतीवर अनिष्ठ परिणाम करत आहेत आणि त्यांच्या पुनरुत्पादनावरही विपरित परिणाम करत आहेत, परिणामी चिमण्या झपाट्याने नष्ट होत आहेत. यावर्षी केवळ मधुमक्षिका आढळून न आल्यामुळे गहू मका उन्हाळी बाजरी कांदा द्राक्षे यासारख्या उन्हाळी पिकांमध्ये २० टक्के घट पाहायला मिळत आहे. त्यामुळे पर्यावरण परिसंस्थेतील तसेच अन्नसाखळीतील सर्वच पशुपक्ष्यांचे महत्त्वाचे स्थान आहे आणि यातील एक जरी कडी गळून पडली तर अन्नधान्याची संपूर्ण शृंखला खंडित होणार.
याप्रसंगी मार्गदर्शन करतांना वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. अशोक पडघन यांनी सांगितले कि ,शहरीकरण व लोकांचे बदलते राहणीमान, फ्लॅट संस्कृतीतील सिमेंटची घरे यामुळे चिमण्या आपली घरे बनवू शकत नाहीत. आधीच्या काळात कौलारू घरं व त्यासमोर असणाऱ्या विहीर यामुळे चिमण्यांना आपले घर बनविणे अतिशय सोपे होते. बदलत्या बांधकामाच्या पद्धतीमूळे पक्षांच्या निवासावर देखील परिणाम होत आहे तसेच कमी होत चाललेली जंगले आणि शहरात निर्माण झालेली मोबाईल टॉवर्स व तारांची जंगले,शेतात होणाऱ्या हानीकारक रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वारेमाप वापर, असे विषारी धान्य खाऊन चिमण्या मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. आपण विधायक कार्य करण्याची हीच वेळ आहे. आपण सर्वांनी मिळून हे पक्षी नामशेष होण्यापासून वाचवण्यासाठी प्रयत्न करणे व निसर्ग संवर्धना करीता हातभार लावणे गरजेचे आहे. सकाळी आपले दार उघडल्यावर चिवचिव करणारी चिऊताई शहरी व आता ग्रामीण भागातून सुद्धा हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे चिमणी संवर्धनाची जबाबदारी आपन घेऊया, त्यांची संख्या पुन्हा वाढण्यासाठी आवश्यक प्रयत्न करू या.
दोनदिवसीय कार्यशाळेमध्ये १९ मार्च ला डॉ. जी. बी. काळे यांच्या मार्गदर्शनात “ नेस्ट फ्रॉम वेस्ट’ या मध्ये टाकाऊ प्लास्टिक बॉटल पासून सुमारे २० ‘बर्ड फिडर्स’ विद्यार्थ्यांद्वारे बनविण्यात आले. दिनांक २० मार्च रोजी महाविद्यालय उद्यानातील ‘बर्डस हॅवेन’ मधील पाण्याचे टाके , पक्ष्यांचे विश्राम स्थानाची साफ- सफाई करून तिथे ‘बर्डस फिडर’ ची स्थापना करण्यात आली . त्यामध्ये शुद्ध पाणी, ज्वारी ,तांदूळ बाजरे इ . धान्ये भरण्यात आली . याप्रसंगी शिबिराचे संयोजक प्रा. सुहास एम. पिढेकर यांनी सांगितले कि, चिमण्या वाचवण्यासाठी खरोखरच काही ठोस काम होत आहे का? हा मोठा प्रश्न आहे. एक होती चिमणी एक आहे चिमणा, चिमणी आणते तांदळाचे दाणे चिमणा आणतो मुगाचे दाने दोन्ही शिजवलेली खिचडी ही चिमणीची मजेशीर गोष्ट आता फक्त पुस्तकांपुरतीच मर्यादित राहिली आहे. आज चिमणी त्यांच्या अस्तित्वाचा निषेध (चिमणी वाचवा मोहीम) जमिनीवरची चिमणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
आपल्या अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे उप-प्राचार्य डॉ. पी. व्ही.उबाळे यांनी सांगितले कि , आपल्या सगळ्यांच्या परिचयाची असलेल्या चिमण्यांची संख्या कमी झालेली दिसते. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी यादिवशी वेगवेगळे पर्यावरण विषयक जागरूकता आणि कृती आपल्या महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागाद्वारे कार्यक्रम आयोजित केले जातात. असे संबंध दिवस आपण लोकांमध्ये जागृती निर्माण करून पर्यावरण संवर्धनामध्ये उत्कृष्ट कार्य करीत आहात. असे कार्यक्रम पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करण्याच्या आपल्या जबाबदारीची आपल्याला जाणीव आणि दृष्टिकोन देतो.आजच्या कार्यक्रमामुळे पक्षी संवर्धन तद्वतच पर्यावरण संवर्धनसारख्या महान कार्यात निश्चितच मदत होईल यात शंका नाही. असेही डॉ. उबाळे पुढे म्हणाले. विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ सुभाषराव बोबडे तसेच मंडळाचे सचिव डॉ. प्रशांत बोबडे यांनी कार्यशाळेला भेट देऊन विद्यार्थी तसेच शिक्षकांचे कौतुक व अभिनंदन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. जी.बी. काळे, प्रा. सुहास पिढेकर, प्रा. मनोज बाभळे, डॉ. दिपाली धरमकर, प्रा. सचिन खंडारे, प्रा. अनिकेत वानखेडे, प्रा. ज्योति शर्मा , प्रा. तृप्ती पारसकर व तर विद्यार्थ्यांमध्ये हर्षल पांढरे, राहुल मानकर, शिवम खराटे,अभिषेक इंगळे, गौरव सूर्यवंशी, पल्लवी तायडे, नेहा हिवराळे, प्रिया चव्हाण, गौरी राजपूत, प्रगती धोटे, साक्षी इंगळे, अनुजा बनकर,स्वाती धुळे ,स्नेहल तळपते आदींनी परिश्रम घेतले. अशी माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रा. डॉ. मोहम्मद रागिब देशमुख यांनी दिली आहे.