चंडिकापूर वाळू घाटातून अवैध वाळू तस्करीचा धक्कादायक प्रकार

अमरावती :- अमरावती जिल्ह्यातील चंडिकापूर येथील मरी माता मंदिर वाळू घाटातून अवैध वाळू तस्करीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागरिकांचा आरोप आहे की, पोलीस आणि महसूल विभागाकडून दुर्लक्ष होत असून, वाळू माफियांना अभय मिळत आहे.
पाहूया संपूर्ण रिपोर्ट :
चंडिकापूर येथील मरी माता मंदिराजवळच्या पूर्णा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. दररोज मध्यरात्री ट्रक, ट्रॉली आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाळूची चोरी होत आहे.दर्यापूर तालुक्यातून काढलेली वाळू भातकुली तालुक्यात नेण्यात येत आहे. प्रशासन डोळेझाक करत असल्याने वाळू तस्करांचे धाडस वाढले आहे.
खोलापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून वाळूची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असतानाही पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केली नाही.वाळू तस्करांना काही अधिकाऱ्यांचे संरक्षण असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. महसूल आणि पोलीस प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यात वाळू घाटांचा लिलाव न झाल्याने शासनाने घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू मोफत देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अवैध उत्खननामुळे ही वाळू लाभार्थ्यांना मिळेल का, असा प्रश्न उपस्थित होतो.
दर्यापूरचे तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि महसूल विभाग यावर कोणती कारवाई करणार? याची जनतेला प्रतीक्षा आहे. अवैध वाळू तस्करीवर कारवाई होणार का? पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यापूर्वी वाळू उपशावर कठोर पावले उचलण्याचे आश्वासन दिले होते. आता प्रत्यक्ष कृती कधी होणार, हा मोठा प्रश्न आहे.
पोलीस आणि महसूल विभागाची भूमिका स्पष्ट होणार का? लोकांची मागणी आहे की, वाळू माफियांना संरक्षण देणाऱ्यांवरही कठोर कारवाई व्हावी. जिल्हा प्रशासनाने अवैध वाळू उपशावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. वाळू तस्करीमुळे परिसरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे.