जागर स्त्री शक्तीचा जिल्हा प्रदर्शनाला अमरावतीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बचतगटांच्या उत्पादनांना मागणी
अमरावती :- स्वयं सहाय्य महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी जिल्हा परिषद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, महिला व बाल विकास विभाग, समाजकल्याण महिला आर्थिक विकास महामंडळ, (माविम) महाराष्ट्र ग्रामीण जीवन्नोनती अभियान (उमेद) यांच्या संयुक्त विद्यमाने जागर स्त्री शक्तीचा जिल्हा प्रदर्शन दि. 22 ते 25 मार्च 2025 दरम्यान सायन्सस्कोर मैदान परिसरात आयोजित करण्यात आले. माविम सुवर्ण महोत्सवानिमित्याने आयोजित नवतेजस्विनी 2025 वैदर्भी महोत्सव, जागर स्त्री शक्तीचा जिल्हा प्रदर्शनमध्ये महिला बचतगटांच्या स्टॉलला चार दिवसीय प्रदर्शनात ग्रामीण महिला भगिनींनी निर्माण केलेली उत्पादने अमरावतीकरांना उपलब्ध झाली.
प्रदर्शनीत 125 पेक्षा अधिक बचतगटांचा प्रदर्शनात सहभाग होता. माविम चे 59 व उमेद चे 70 स्टॉल्स लावण्यात आले. प्रदर्शनात शोभिवंत वस्तु, दैनंदिन वापरासाठी उपयुक्त वस्तू, पापड, मसाले, महिलांना गृहउपयोगी वस्तू, गटांनी तयार केलेली रासायनिक रंग विरहित, उत्पादने, मायक्रोनच्या शोभिवंत वस्तु, बांबूचे टोपले, फड़ा, वारली पेंटिंग, गोडंबी, घरातील, देव्हाऱ्यातील शोभिवंत वस्तु, ज्वेलरी, मातीपासून बनविलेल्या वस्तु तसेच खाण्याचे स्वादिष्ट पदार्थ, आवळा पदार्थ, रेडीमेड ढोकळा पीठ, नाना प्रकारचे सुगंधी मसाले, सर्व प्रकारचे लोणची, विविध प्रकारचे पापड व पापड मसाले, पॉपकॉर्न केळीपासून बनविलेले चिप्स, सर्व प्रकारचे तृणधान्य, कडधान्य, डाळी आदींच्या खरेदीला अमरावतीकरांनी चांगला प्रतिसाद दिला.
त्याचप्रमाणे, विशेष दालनांद्वारे जेवणाबरोबरच खीर, मांडे, रोडगे, आवळा पुरणपोळी, बिट्टया, झुणका भाकर, मटण मांडे, रोडगे अशा मराठमोळ्या पदार्थांची रेलचेल होती. प्रदर्शनासोबतच विविध सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ, महिलांसाठी विविध प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.