नितीन गडकरींच्या हस्ते ‘परवाह करेंगे, सुरक्षित रहेंगे’ ऍनिमेटेड व्हिडिओचे प्रक्षेपण
नागपुर :- नागपुरात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ‘परवाह करेंगे, सुरक्षित रहेंगे’ या विशेष ऍनिमेटेड व्हिडिओचे उद्घाटन करण्यात आले. न्यूरॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया यांच्या संकल्पनेतून तयार झालेला हा व्हिडिओ मुलांमध्ये रस्ता सुरक्षा आणि अपघातानंतरच्या तातडीच्या उपचारांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी एक महत्त्वाचा प्रयत्न आहे.
याचा सविस्तर अहवाल पाहुया महत्वाचा उपक्रम :
नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ‘परवाह करेंगे, सुरक्षित रहेंगे’ या ऍनिमेटेड व्हिडिओचे उद्घाटन करण्यात आले. हा उपक्रम न्यूरॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आला आहे.
कार्यक्रमात न्यूरोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. मानस पानिग्रही, सचिव डॉ. परितोष पांडे आणि प्रोफेसर डॉ. प्रमोद गिरी यांनी लॅन्सेटच्या अहवालातील धक्कादायक आकडेवारी सादर केली. अहवालानुसार, अपघातांमध्ये होणाऱ्या ६०% मृत्यू हे अपघातानंतर पहिल्या तासात होतात. गडकरी यांनी या व्हिडिओला त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध केले आणि या उपक्रमाचे कौतुक केले. त्यांनी व्हिडिओ प्रत्येक शाळेत दाखवावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
व्हिडिओद्वारे मुलांना रस्ता सुरक्षा नियमांचे पालन कसे करावे आणि अपघात झाल्यास तातडीने कोणत्या उपाययोजना कराव्यात याची माहिती दिली जाते.कार्यक्रमाला डॉ. शिवाजी देशमुख, डॉ. योगेश देशमुख, डॉ. निलेश अग्रवाल, डॉ. श्याम बाभुळकर, डॉ. संजोग गजभिये, डॉ. रामानुज काबरा आणि डॉ. मिताली गिरी यांसारखे तज्ज्ञही उपस्थित होते.
लॅन्सेटच्या अभ्यासानुसार ३०% मृत्यू हे अपघातानंतर १ ते २४ तासांच्या आत होतात, तर १०% मृत्यू २४ तासांनंतर होतात. या पार्श्वभूमीवर तत्काळ उपचारांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.गडकरी यांनी या ऍनिमेटेड व्हिडिओच्या माध्यमातून अपघातानंतरची तातडीची काळजी आणि रस्ता सुरक्षेच्या नियमांबाबत जागरूकता वाढवण्याचा निर्धार व्यक्त केला.
हा व्हिडिओ देशभरातील शाळांमध्ये दाखवण्यात येईल, ज्यामुळे मुलांमध्ये सुरक्षाविषयी सकारात्मक बदल घडवला जाईल. या उपक्रमामुळे रस्ता अपघातांमध्ये मृत्यूचे प्रमाण कमी होईल आणि सुरक्षित प्रवासाची जाणीव समाजात निर्माण होईल, अशी अपेक्षा तज्ज्ञांनी व्यक्त केली.