पुणे आणि ठाण्यातील धक्कादायक लैंगिक अत्याचाराच्या घटना; मुलीवर अत्याचार करणारे आरोपी अटक

पुणे :- पुण्यातील वाघोली येथे नऊ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचाराची घटना घडली आहे. या प्रकरणी पिठाच्या गिरणीत काम करणाऱ्या एका 27 वर्षीय कामगाराला ताब्यात घेण्यात आलं आहे. सोमवारी सकाळी ही चिमुकली शाळेत जात असतानाच आरोपीची तिच्यावर नजर पडल्यानंतर त्याने या चिमुकलीला एकांकात नेऊन दुष्कर्म केलं.
पुण्यात नेमकं घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी ही चौथीत शिकणारी मुलगी शाळेत निघाली असताना आरोपींना तिला थांबून चॉकलेट तसेच खाऊच आमीष दाखवलं. त्यानंतर त्यानंतर तिला आडोशाला घेऊन गेला. बाहेर आल्यानंतर मुलगी रस्त्यावर रडत उभी होती. आसपासच्या नागरिकांनी तिला पाहिलं आणि विचारपूस केली. तेव्हा तिनं तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. वाघोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत बायफ रोडवर ही घटना घडली. स्थानिक नागरिकांनी 112 क्रमांकावर फोन करून पोलिसांना बोलावून घेतलं. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे.
ठाण्यात वडिलांकडूनच मुलीवर लैंगिक अत्याचार
दोन दिवसांपूर्वीच ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमध्येही एका चिमुकलीवर तिच्याच वडिलांनी लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलं होतं. पत्नीपासून विभक्त झालेला नराधम मुलीवर अत्याचार करायचा हे पोलिसांनी गुड टच, बॅड टचचे धडे देताना समोर आलं. उल्हासनगरमधील हा आरोपी बाप त्याच्या दोन मुलींसह राहत होता. त्याची पत्नी त्याच्यापासून विभक्त झाल्याने दोन्ही मुली त्याच्यासोबतच राहात होत्या. आपल्या मोठ्या मुलीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत त्यानं तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. अशातच या मुलीच्या शाळेत उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलिसांकडून गुड टच आणि बॅड टचची माहिती देण्यात आली. ते ऐकून या चिमुकलीला आपले वडीलच आपल्यासोबत दुष्कर्म करत असल्याचं उमगलं.
पत्नीने दाखल केली तक्रार
याबाबत पीडित चिमुकलीने शिक्षिकेला माहिती दिल्यानंतर शिक्षिकेनं पोलिसांच्या मदतीनं तिच्या आईला ही बाब सांगितली. याबाबत आईने मध्यवर्ती पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून या नराधम बापाविरोधात पोक्सो आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. यानंतर मुलीचा ताबा आईकडे देण्यात आला असून बाप आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या प्रकारामुळे उल्हासनगरमध्ये संतापाची लाट उसळली आहे.