मूर्तिजापूरमध्ये दोन गटांमध्ये तुफान हाणामारी | एक ठार, सहा ते सात जखमी

मूर्तिजापूर :- अकोल्यातील मूर्तिजापूरमध्ये दोन गटांमध्ये झालेल्या तुफान हाणामारीमुळे परिसरात खळबळ माजली आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या या हाणामारीत एका तरुणाचा मृत्यू झाला आहे, तर सहा ते सात जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने मूर्तिजापूर शहर हादरले आहे.
पाहूया सविस्तर रिपोर्ट :
अकोल्याच्या मूर्तिजापूर शहरातील सिरसो बेड्यावर दोन गटांमध्ये किरकोळ वादातून तुफान हाणामारी झाली.या घटनेत 19 वर्षीय सुरज चंदू भोसले याचा मृत्यू झाला आहे, तर संगीता चंद्र भोसले, तारी पवार, रितेश चंद्र भोसले, बबन पवार आणि किशोर भोसले हे गंभीर जखमी झाले आहेत. या हाणामारीत महिलांचाही समावेश असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
प्राथमिक माहितीनुसार, हा वाद किरकोळ कारणावरून निर्माण झाला होता, मात्र त्याचे गंभीर परिणाम झाले.घटनेची माहिती मिळताच मूर्तिजापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून गुन्हा नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे.सर्व जखमींवर मूर्तिजापूर आणि अकोला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेनंतर मूर्तिजापूरमध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, हाणामारीचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. स्थानिक प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे सांगितले आहे.
मूर्तिजापूरमध्ये झालेल्या या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती आटोक्यात आणली असली, तरीही नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सिटी न्यूजच्या माध्यमातून आम्ही नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करतो. पुढील अपडेट्ससाठी पाहत राहा सिटी न्यूज.