शेतकऱ्यांचा आक्रोश! मुर्तिजापुर तहसील कार्यालयावर मोर्चा | मदतीपासून वंचित शेतकऱ्यांचा एल्गार

मुर्तिजापुर :- शेतकऱ्यांचा आक्रोश उफाळून आला आहे! अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापुर तहसील कार्यालयावर आज शेकडो शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. अतिवृष्टीमुळे उध्वस्त झालेल्या पिकांचं नुकसान भरपाई मिळावी, अशी या शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे.
जाणून घेऊया या आंदोलनाची संपूर्ण सविस्तर माहिती :
अकोला जिल्ह्यातील निंभा, हातगाव, जामठी आणि कुरुम सर्कलमधील शेतकऱ्यांनी आज तहसील कार्यालयावर मोर्चा काढत शासनाविरोधात संताप व्यक्त केला. अतिवृष्टीमुळे कोसळलेल्या पिकांची नुकसान भरपाई मिळावी, ही त्यांची प्रमुख मागणी आहे. सरकारच्या अनुदान योजनेतून वगळण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यांच्या मते, अतिवृष्टीचा मोठा फटका बसला असतानाही महसूल विभागानं मदतीच्या यादीत त्यांना समाविष्ट केलं नाही.’आमचं नुकसान दिसत नाही का?’ सरकार आमच्याकडे का डोळेझाक करतंय?’ अशा संतप्त घोषणा देत शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर जोरदार आंदोलन केलं.
शेतकऱ्यांनी प्रशासनावर दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी थेट तहसीलदारांना निवेदन सादर करत त्वरित निर्णय घेण्याची मागणी केली.अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पीक तर गेलेच, पण आता पुढील हंगाम कसा करायचा, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. शासनाच्या मदतीशिवाय त्यांचं पुढील पाऊल कठीण आहे.
या आंदोलनाला स्थानिक राजकीय नेत्यांनीही पाठिंबा दिला असून सरकारनं लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.यासंदर्भात तहसीलदारांनी आंदोलनकर्त्यांना चर्चा करण्यासाठी बोलावलं. त्यांनी लवकरच या प्रकरणाची चौकशी करून योग्य तो न्याय दिला जाईल, असं आश्वासन दिलं आहे.
सरकारनं त्वरित निर्णय घेतला नाही, तर पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला स्थानिक नागरिकांनी मोठा पाठिंबा दिला असून, शासनानं तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. शेतकऱ्यांच्या आक्रोशानंतर सरकार कसा प्रतिसाद देणार आणि किती लवकर मदत पोहोचवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
शेतकऱ्यांचा आक्रोश सरकारपर्यंत पोहोचला आहे. आता प्रशासन यावर कोणता निर्णय घेते आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांना कसा प्रतिसाद देते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सिटी न्यूज तुमच्यासाठी या आंदोलनाच्या प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवणार आहे. पुढील अपडेटसाठी पाहत राहा सिटी न्यूज !