मुंबईत ४ वर्षांच्या मुलाचे अपहरण करून हत्या; नातेवाईकाचं धक्कादायक कृत्य

मुंबई :- मुंबईमध्ये ४ वर्षांच्या मुलाचे अपहरण करून त्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नातेवाईकानेच या चिमुकल्याची हत्या केली आणि आरोपी गुजरातला पळून गेला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी २०० सीसीटीव्ही तपासले. त्यानंतर त्याला सूरतमधून अटक करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, कांदिवली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील इराणी वाडी येथे ही घटना घडली आहे. इराणी वाडीत आपल्या कुटुंबीयांसोबत राहणाऱ्या ४ वर्षांच्या मुलाची अपहरण करून हत्या करण्यात आली. याप्रकरणी पालकांच्या तक्रारीवरून कांदिवली पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू केला होता. चिमुकल्याची हत्या करून आरोपी गुजरातमध्ये पळून गेला होता.
मृत मुलाच्या आई-वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात अपहरण आणि हत्येचा गुन्हा दाखल केला. या घटनेचे गांभीर्य पाहून कांदिवली पोलिसांच्या पथकाने १५० ते २०० सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपी सूरत येथे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर कांदिवली पोलिसांनी सूरत गाठून आरोपीला बेड्या ठोकल्या. अक्षय अशोक गरूड २५ वर्षे असं आरोपीचे नाव आहे.
आरोपी अक्षय गरूड हा हत्या करण्यात आलेल्या चिमुकल्या मुलाचा नातेवाईक आहे. आरोपीने असे कृत्य का केले यामागचे कारण समोर आले नाही. सध्या आरोपी कांदिवली पोलिसांच्या ताब्यात आहे. आरोपीने लहान मुलाचे अपहरण करून त्याची हत्या का केली? याबाबतचा तपास कांदिवली पोलिस करत आहेत. या घटनेमुळ खळबळ उडाली आहे.