राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी अमरावतीचा सोहम डफळेची निवड

अमरावती :- अमरावती जिल्ह्याचा अभिमान – सोहम डफळेची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड! बिहारमधील गया येथे होणाऱ्या 34 व्या सबज्युनियर नॅशनल कबड्डी स्पर्धेत विदर्भाचं प्रतिनिधित्व करणार सोहम. या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्हाभरात कौतुकाचा वर्षाव होत आहे. चला, पाहुया यशाचा हा प्रेरणादायी प्रवास!
कबड्डीच्या मैदानावर उत्कृष्ट खेळाडू म्हणून आपली ओळख निर्माण करणारा अमरावतीचा सोहम डफळे आता राष्ट्रीय स्तरावर चमकणार आहे. स्थानिक शिवाजी उच्च माध्यमिक शाळेतील इयत्ता नववीत शिकणाऱ्या सोहमची बिहार राज्यातील गया येथे होणाऱ्या 34 व्या सबज्युनियर नॅशनल कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
सोहमने राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये उत्तम खेळाचे प्रदर्शन करीत आपले स्थान पक्के केले. बल्लारशा येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत त्याने अमरावती जिल्हा संघाचे प्रतिनिधित्व केले. अमरावती संघाने उत्कृष्ट कामगिरी करीत विजय मिळवला आणि सोहमने आपल्या खेळ कौशल्याने सर्वांची मने जिंकली.
220 हून अधिक खेळाडूंच्या चाचण्यांमधून निवड समितीने 24 उत्कृष्ट खेळाडूंची निवड केली, ज्यामध्ये सोहमने स्थान पटकावले. विदर्भ कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष जितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भ संघ बिहारला रवाना होणार आहे.
सोहम डफळेच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत देशमुख, उपमुख्याध्यापक पपू वानखडे, क्रीडा शिक्षक विजय तारापुरे आणि मार्गदर्शक सुयोग गोरले यांनी त्याचे कौतुक केले आहे. तसेच कुटुंब, मित्रपरिवार आणि संपूर्ण जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.सोहमने आपल्या यशाचे श्रेय हनुमान क्रीडा मंडळ मोर्शी, साई स्पोर्ट्स विदर्भ, शाळेतील शिक्षक आणि आपल्या आई-वडिलांना दिले आहे. आता संपूर्ण विदर्भाचे लक्ष सोहमच्या दमदार खेळीवर राहणार आहे.