LIVE STREAM

AmravatiLatest News

व्यवस्था बदलायची असेल; तर सुरुवात स्वत:पासून करा – संजिता महापात्र

अमरावती :- गावपाड¬ातील जुनी पद्धत जी निसर्गाला सोबत घेऊन राहण्याची होती, ती चांगली होती. मात्र ती राहिली नाही. माती, पाणी आणि माणसाचे जीवन यात एकात्म भाव होता. त्यात आज तुटलेपण निर्माण झाले. माणूस बदलला, जगण्याचे संदर्भ बदलले आणि माणूसपण लोप पावत आहे. माणूस स्वार्थी झाला आणि निसर्गाने पाठ फिरवली. पाणी पातळी खाली गेली, पाण्याचे टँकर सुरू झाले. त्यासाठी पाणी व्यवस्थेचा अभ्यास करून ते अंमलात आणणे गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जलव्यवस्थापन आमच्या विभागाचा आदर्श झाला पाहिजे. अर्थात, आजची विस्कळीत व्यवस्था बदलायची असेल, तर सुरुवात स्वत:पासून केली पाहिजे तेव्हा पाणी चळवळ मोठी होईल, असे प्रतिपादन अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागांतर्गत एम. ए. आजीवन अध्ययन व विस्तार अभ्यासक्रमाच्यावतीने आंतरराष्ट्रीय जल दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय कार्यशाळेत प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. विचारपिठावर विद्यापीठाच्या मानवविद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. मोना चिमोटे, आजीवन अध्ययन व विस्तार मंडळाचे सदस्य डॉ. रवींद्र सरोदे, बीजभाषक प्रा. अनिरुध्द पाटील, विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील उपस्थित होते.

पाणी भीषणता, पाणी व्यवस्थापन, पाणी अडवा पाणी जिरवा आणि अमरावती जिल्ह्यातील पाणी टंचाई यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जलव्यवस्थापनाचे दाखले देत संजिता महापात्र पुढे म्हणाल्या, आजच्या पाणी टंचाईच्या काळात पाण्याचे महत्व कळले पाहिजे. त्यासाठी जलयुक्त शिवार अभियान, पाणी आडवा पाणी जिरवा अभियान असे उपक्रम राबविले जात आहे. यासाठी गावागावातून संघटितपणे काम झाले पाहिजे. या संपूर्ण उपक्रमांची जनजागृती मोठ्या प्रमाणात व्हावी. जलसाक्षरता, जल अंकेक्षण ह्या गोष्टी सुध्दा महत्त्वाच्या आहेत. या सगळ्या उपक्रमांची महती मांडताना शिवाजी महाराजांचे जलव्यवस्थापन आज किती महत्त्वाचे आहे याचाही विचार गांभीर्याने झाला पाहिजे.

बीजभाषक प्रा. अनिरुद्ध पाटील म्हणाले, गणसंस्कृती नदीकाठावर का वसली? गणाच्या उत्पत्तीचा शोध घेतल्यास जलमहत्व कळेल. पाणी प्राण्यांचे प्रगतीचे लक्षण आहे, म्हणून त्याचा सर्वसमावेशक विचार झाला पाहिजे. उद्काच्या माध्यमातून स्वराज्य निर्माण करणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे जलव्यवस्थापन अभ्यासले, तर पाणी मानवी जीवनाला किती महत्त्वाचे आहे. आज्ञापत्र ते गाथासप्तशती असे पाण्याचे दाखले देत उपस्थितांना पाण्यासाठी काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

पाणी हा जीवन जगणा­या प्रत्येक माणसाचा जिव्हाळ्याचा विषय असला पाहिजे. झाडं जगवली तर पाणी मिळेल यासाठी वर्तमान पाणी अभ्यासकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाणी व्यवस्थापनाचा अभ्यास करून कृती केली पाहिजे आणि पाण्यासाठी एक चळवळ उभी करावी, असे कळकळीचे आवाहन उद्घाटन सत्राचे अध्यक्ष डॉ. मोना चिमोटे यांनी केले. यावेळी डॉ. रवींद्र सरोदे म्हणाले, लोकसंख्येला अनुसरून पाणी वापर करणे, पाण्याचे ऑडिट होणे आणि पाणी वाचविणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी असली पाहिजे.

छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकशिक्षक गाडगे बाबा यांच्या प्रतिमांचे पूजन करून जलसाक्षरतेचे महत्व पटवून देण्याचे घोषवाक्य असलेली छत्री फिरवून, माठात पाणी तसेच जलपूजन मान्यवरांनी केले. डॉ. श्रीकांत पाटील यांनी प्रास्ताविकातून पाणी, मणुष्यजीवन यांचे महत्त्व पटवून देताना आपण काय केले पाहिजे व त्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता याविषयी विचार मांडले. तसेच आजीवन अध्ययन विभागाच्यावतीने सुरू असलेल्या कौशल्ययुक्त व स्वयंरोजगार प्राप्त करून देणा­या आठ अभ्यासक्रम व 164 अल्पकालीन प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचा उपस्थितांना परिचय करून दिला. संचालन प्रा. वैभव जिसकार, तर आभार प्रा. प्रणव तट्टे यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यापीठ परिसर, तसेच अमरावती शहरातील गणमान्य नागरिक, पाणी चळवळीतील कार्यकर्ते, अभ्यासक, संशोधक, प्राध्यापक तसेच बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!