अकोला: डोंगरगाव फाट्यावर भीषण अपघात – 40 वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू

अकोला :- अकोला जिल्ह्यातील डोंगरगाव फाट्यावर एक भीषण अपघात घडला आहे. अज्ञात वाहनाच्या धडकेत 40 वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची दुःखद घटना समोर आली आहे.
घटनेचं सविस्तर विश्लेषण पाहूया आमच्या विशेष रिपोर्टमध्ये :
अकोला-मुर्तीजापूर मार्गावरील डोंगरगाव फाट्यावर रात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात घडला.प्रशांत अनासाने (वय 40) हे अकोला जुने शहरातील रहिवासी होते आणि सध्या मुंबईत वास्तव्यास होते. प्रशांत अनासाने आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी डोंगरगावला गेले होते. परंतु फाट्याजवळ एका भरधाव अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की प्रशांत अनासाने यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.
डोंगरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, अज्ञात वाहनाचा शोध सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिकांकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे तपास केला जात आहे.
सध्या अपघाताचे नेमके कारण समजू शकलेले नाही. वेगमर्यादा ओलांडणे किंवा वाहन चालकाच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.