दिव्यांग रुग्णांची ससेहोलपट – प्रहार जनशक्तीचा आवाज!

अमरावती :- दिव्यांग रुग्णांना त्यांच्या मूलभूत हक्कांसाठीही संघर्ष करावा लागतोय. अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी रुग्णांना होत असलेला त्रास आणि प्रहार जनशक्ती पक्षाची भूमिका यावर सविस्तर रिपोर्ट.
चला पाहूया ही विशेष बातमी :
अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दिव्यांग रुग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रमाणपत्रासाठी रुग्णालयात सतत चकरा माराव्या लागत असल्याने त्यांचा त्रास अधिकच वाढतोय. विशेषतः ज्यांना चालता येत नाही, त्यांना प्रवेशद्वारापासूनच मोठा संघर्ष करावा लागतो.
अशातच दिव्यांग रुग्णांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे महानगर प्रमुख बंटी रामटेके यांनी पुढाकार घेतला. त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौदाळे यांची भेट घेऊन दिव्यांगांसाठी तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली. अपघातात दिव्यांग झालेल्या व्यक्तींना एका महिन्याच्या आत प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.
त्याचप्रमाणे, पुनर्रतपासणी प्रक्रियेसाठी अकोल्याऐवजी अमरावतीतच सोय उपलब्ध करून देण्याचेही मागणीपत्र देण्यात आले. डॉ. सौदाळे यांनी या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टिकोनाने पाहण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे संपर्क प्रमुख गोलू पाटील, अजय तायडे, नंदू वानखडे आणि प्रतीक गोंडाणे उपस्थित होते.