दुभाजकांवर वाया गेले लाखो रुपये – मनपाची हलगर्जीपणा उघड!

अमरावती :- शहरातील सौंदर्य वाढवण्यासाठी लाखो रुपये खर्च करून दुभाजकांवर झाडं आणि वेलींनी शुशोभीकरण करण्यात आलं. मात्र उन्हाच्या तडाख्यात या वृक्षवेलींनी जीव गमावला. काँग्रेस नगरसारख्या व्हीव्हीआयपी परिसरातसुद्धा हे विदारक चित्र पाहायला मिळत आहे.
पाहूया सविस्तर रिपोर्ट :
मार्च महिना सुरू होताच उन्हाळ्याचा कडाका वाढला आणि त्यासोबतच शहरातील दुभाजकांवरील शुशोभीकरणाची वाट लागली आहे.लाखो रुपये खर्चून लावलेली वृक्षं आणि वेलींना आवश्यक पाणी आणि देखभाल मिळालेली नाही. परिणामी, अनेक झाडं कोमेजली, तर काही झाडं गायबच झाली.
काँग्रेस नगर परिसर, जो व्हीव्हीआयपी झोन म्हणून ओळखला जातो, तिथल्या दुभाजकांचीही अवस्था पाहण्यालायक नाही.माजी लेडी गव्हर्नर कमलताई गवई यांनी निसर्गप्रेमाच्या हेतूने काँग्रेस नगरमधील कमलपुष्प बंगला परिसरात दुभाजकांवर झाडं लावली होती.
मात्र मनपा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे इतर भागातील झाडं करपून गेली, तर काही ठिकाणी कचऱ्याने झाडांची जागा घेतली आहे.रुख्मिणी नगर बस स्थानक मार्गावरील दुभाजकही याला अपवाद नाही. तिथेही वाळलेल्या झाडांऐवजी कचऱ्याचा साचाच पाहायला मिळतो.
यावरून मनपा प्रशासनाची उद्यानविभागाकडून होत असलेली दखलशून्यता स्पष्ट होते.शुशोभीकरणासाठी दरवर्षी कोट्यवधींचा खर्च केला जातो, पण त्याची निगा राखली जात नाही. नागरिक आता प्रश्न विचारत आहेत की, या वाया गेलेल्या निधीला जबाबदार कोण?
शहराच्या सौंदर्यीकरणासाठी होणाऱ्या लाखो रुपयांच्या खर्चाचा हिशेब नागरिक आता मागत आहेत.मनपा प्रशासन आता यावर काय कारवाई करणार किंवा सामान्य जनतेच्या या प्रश्नांची काय उत्तरं देणार हे पाहावं लागणार आहे.