नाशिक: शाळकरी मुलीची छेडछाड, रिक्षाचालकांवर गुन्हा दाखल

नाशिक :- नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. दोन रिक्षाचालकांनी मुलीची छेड काढत तिचे काही फोटो काढले आहेत. नंतर तिला जबरदस्तीने नंबर देत तिला कॉल करायला सांगितले. मुलीने त्यांच्या तावडीतून पळ काढला आणि पोलीस ठाणे गाठत आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक करत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
राज्यात बलात्कार आणि विनयभंगाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. नाशिकमध्येही एक संतापजनक घटना घडली. एका शाळकरी मुलीची दोन रिक्षाचालकांनी छेड काढली. भररस्त्यात तिची वाट अडवली. नंतर तिची छेड काढली. दोघांनी तिला त्यांचे कागदावर नंबर लिहून दिला. तसेच कॉल करण्यासही धमकी दिली.
मोबाईल नंबर दिल्यानंतर आरोपी इतक्यावरच थांबले नाही. त्यांनी मुलीचे स्वत:च्या मोबाईलवर काही फोटोही काढले. पीडित मुलीने त्यांच्या तावडीतून पळ काढला. घर गाठत पालकांना याची माहिती दिली. पीडित मुलीने नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रारही दाखल केली.
पीडित मुलीच्या तक्रारीवरून भद्रकाली पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयित मुस्तफा शेख आणि अरबाज पठाण या दोघांना अटक केली. तसेच आरोपींविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. संशयीतांकडून मोबाईल हस्तगत करण्यात आले असून गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या रिक्षाचाही शोध पोलीस घेत आहे. या प्रकरणानंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
बेशिस्त मुजोर रिक्षाचालकांविरोधात पोलिसांची कारवाई नाशिक शहरातील बेशिस्त आणि मुजोर रिक्षाचालकांविरोधात पोलिसांनी कारवाईला सुरूवात केली आहे. आत्तापर्यंत ३,३४२ बेशिस्त आणि मुजोर रिक्षा चालकांविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे. यामध्ये गणवेश न घालणाऱ्या तब्बल २,००० रिक्षाचालकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. तसेच वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या तब्बल १,२०० रिक्षाचालकांवरही कारवाई करण्यात आली आहे.