दारुच्या नशेत पतीने बायकोचा गळा आवळून खून, मृतदेह इलेक्ट्रिक पंपाच्या पेटीत लपवला; सांगलीत धक्कादायक घटना

सांगली :- शिराळा तालुक्यातील मांगले येथे पतीने दारुच्या नशेत पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना घडली आहे. हत्या केल्यानंतर नवऱ्याने बायकोचा मृदेह विद्युत पंपाच्या पेटीत कोंबून ठेवला होता. काही दिवसांपूर्वी मेरठमध्ये एका पत्नीने प्रियकराच्या साथीने आपल्या नवऱ्याचा खून करुन त्याला मृतदेह प्लॅस्टिकच्या ड्रममध्ये टाकून त्यावर सिमेंट टाकल्याचा प्रकार समोर आला होता. या घटनेची देशभरात चर्चा असताना आता सांगलीच्या शिराळ्यात अंगावर शहारे आणणारी ही घटना समोर आली आहे.
प्राजक्ता मंगेश कांबळे (वय 28) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून मंगेश चंद्रकांत कांबळे असे संशयित आरोपी पतीचे नाव आहे. खून केल्यानंतर मंगेश कांबळे स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाला. मंगेशचा भाऊ निलेश आणि त्याची आई गेल्या पंधरा वर्षापासून मांगले येथे वास्तव्यास आहे. मांगले – वारणानगर रस्त्यावर जोतीबा मंदिराच्या समोर रामचंद्र वाघ यांच्या कौलारू घरात ते भाड्याने राहत आहेत. चार दिवसांपूर्वी मंगेश, त्याची पत्नी प्राजक्ता व सहा वर्षाचा मुलगा शिवम तीन वर्षाची मुलगी शिवन्या मुंबईहून आई आणि भावाकडे रहायला आले होते. गेल्या चार दिवसांपासून एकत्र राहणारे मंगेश आणि प्राजक्ता आज सकाळी भाऊ निलेश आणि आई देववाडी येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते . निलेश व प्राजक्तामध्ये वाद झाला. वाद विकोपाला जाऊन मंगेशने प्राजक्ताचा ओढणीने गळा आवळून खून केला.
बायकोचा मृतदेह इलेक्ट्रिक पंपाच्या पेटीत हात-पाय तोडून कोंबला
मंगेश कांबळे याने प्राजक्ताला ठार मारल्यानंतर तिचा मृतदेह बाजूच्या खोलीत घर मालकाने ठेवलेल्या विद्युत पंपाच्या मोडक्या पेटीत हातपाय मोडून झाकून ठेवला. त्यानंतर मंगेशने खोलीला बाहेरून कुलूप लावले. मंगेशने त्याचा भाऊ निलेशला फोन करुन मी शिराळ्याला जाणार असल्याचे सांगितले. गाडी घेऊन ये, असा निरोप भावाला दिला. त्यानंतर मंगेशचा भाऊ निलेश देववाडीतून मांगले गावात आल्यानंतर मंगेशने भावाकडून गाडी घेऊन तो शिराळ्याकडे निघून गेला. यादरम्यान मंगेशचा सहा वर्षाचा मुलगा शिवम दारातच रडत होता. त्यावेळी निलेशने त्याची विचारपूस केली. तेव्हा सहा वर्षाच्या शिवमने मम्मी-पप्पांचे दोघांचे भांडण होऊन पप्पांनी आईला मारून खोलीत ठेवल्याचे सांगितले .
शिवमने सांगितलेला प्रकार ऐकून निलेशने त्याचा भावाल फोन करुन कुठे आहेस विचारले. यावर मंगेशने मी गोरक्षनाथ मंदिराजवळ असल्याचे सांगितले. यानंतर निलेशने देववाडी येथे असणाऱ्या त्याच्या बहिणीली आणि तिच्या पतीला मांगले येथे बोलावून घेतले. ते दोघे आल्यानंतर निलेशने मंगेशला पुन्हा फोन केला. तेव्हादेखील मंगेश हा गोरक्षनाथ मंदिराजवळच होता. तेव्हा या तिघांनी तिकडे जाऊन मंगेशला झालेल्या प्रकाराबद्दल विचारणा केली. मंगेशने आपण प्राजक्ताचा खून केल्याची कबुली दिली. तेव्हा या तिघांनीही मंगेशला पोलिसांसममोर आत्मसमर्पण करायला सांगितले. त्यानंतर आरोपी मंगेश कांबेळे स्वतः शिराळा पोलिसांत हजर झाला.