बापलेकांना सिकलसेल आजार, मेळघाट सेल फक्त नावापुरतं – एका आदिवासी वडिलांची व्यथा

मेळघाट :- आदिवासींच्या आरोग्यासाठी सुरू केलेला मेळघाट सेल फक्त कागदावरच आहे का? सिकलसेलने त्रस्त 13 वर्षीय मुलाला मदतीची नितांत गरज असताना, मदत केंद्र कुलूपबंद होतं. “मेळघाटातील आदिवासी नागरिकांसाठी शासकीय रुग्णालयात मेळघाट सेल केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. मात्र, ही सुविधा प्रत्यक्षात किती उपयोगी आहे, याचा अनुभव चिखलदऱ्यातील किसन कासदेकर यांनी घेतला. रुग्णालयात जागा नाही, रक्ताची टंचाई आणि प्रशासनाची उदासीनता.
बघूया एका असहाय वडिलांची व्यथा सिटी न्यूजवर :
मेळघाटातील चिखलदऱ्यातील किसन कासदेकर यांचा मुलगा सिकलसेल आजाराने ग्रस्त आहे. हा आजार असलेल्या रुग्णांना वेळोवेळी रक्ताची गरज भासते. 26 मार्चच्या रात्री मुलाची प्रकृती बिघडल्याने त्यांनी तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालय गाठले. पण वॉर्ड क्रमांक 4 मध्ये आधीच एका बेडवर दोन रुग्ण उपचार घेत होते. ही परिस्थिती पाहून मुलगा भयभीत झाला. मुलाला समजावताना वडील आणि आईच्या डोळ्यात अश्रू तरळले.
अशा परिस्थितीत, वडिलांनी मदतीसाठी मेळघाट सेल गाठले. मात्र, तिथे कुलूप लावलेले पाहून त्यांच्या आशा मावळल्या. जागा नाही, उपचार नाही, आणि प्रशासनाची कोणतीही मदत नाही. रुग्णालयातील मेळघाट सेल हा खास आदिवासी रुग्णांसाठी स्थापन करण्यात आला होता. मात्र, गरजेच्या वेळी तेथे कुलूप लावलेले होते. वडिलांनी वैद्यकीय मदतीसाठी अनेक दारं ठोठावली, पण कुठेही आधार मिळाला नाही. रक्ताची गरज असताना प्रशासनाकडून कोणतीही मदत मिळाली नाही. शेवटी, वडिलांनी ओळखीच्या डॉक्टरला फोन केला. डॉक्टरांनी तत्काळ रक्तदात्याची व्यवस्था केली. मात्र, मुलाला ताप असल्याने रक्त चढविणे शक्य झाले नाही. 27 मार्चला रुग्णसंख्या वाढल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली. बेडची अनुपलब्धता पाहता मुलाला जमिनीवर सलाईन लावण्यात आली. यावेळी, मेळघाट सेलची भूमिका आणि व्यवस्थेतील ढिसाळपणा समोर आला. कुलूपबंद मेळघाट सेल, दुर्लक्षित प्रशासन आणि मूलभूत सुविधांचा अभाव… ही परिस्थिती आदिवासींसाठी किती अन्यायकारक आहे? किसन कासदेकर यांनी सिटी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत या संपूर्ण घटनेवर नाराजी व्यक्त केली. सरकारी यंत्रणेची अशी दयनीय स्थिती पाहून त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.