मुख्यमंत्र्यांनी महेश खोमणे यांच्या तक्रारीनंतर मनपा कचरा निविदा प्रक्रियेला स्थगिती दिली

नांदेड :- घनकचरा व्यवस्थापन निविदा प्रक्रिया राबवताना, मनपाने ठराविक कंत्राटदाराचे हित जोपासले आहे, असा आरोप करत माजी विरोधी पक्षनेते महेश खोमणे यांनी निविदा प्रक्रिया रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. खोमणे यांच्या तक्रारीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आहे. निविदा प्रक्रियेची चौकशी करून अहवाल सादर करावा, तोपर्यंत अंतिम निर्णय घेऊ नये, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यामुळे कचरा निविदा प्रक्रियेला आता ब्रेक लागला आहे.
मागील तीन वर्षापासून मनपावर प्रशासक राज आहे. शहरातील कचरा संकलनाचे काम आर अँड बी या कंपनीला देण्यात आले. या कंपनीला सात वर्षाची मुदतवाढ देण्यात आली होती. सात वर्षानंतर पुन्हा आर अँड बी याच कंपनीला कचरा संकलनाचे काम देण्याचा घाट महापालिकेने घातला. त्यामुळे महापालिकेने राबविलेली ही निविदा प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
दरम्यान, या निविदा प्रक्रियेच्या विरोधात महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते महेश खोमणे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली. खोमणे यांच्या तक्रारीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत निविदा प्रक्रियेला स्थगिती देण्याचे आदेश दिल्याची माहिती महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते महेश खोमणे यांनी दिली.
तर, महेश खोमणे यांच्या तक्रारीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कचरा निविदा प्रक्रियेला स्थगिती देण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे निविदा प्रक्रियेतील वाद कायम असून, त्याची चौकशी करून पुढील निर्णय घेतला जाईल. आता महापालिकेने राबविलेल्या कचरा निविदा प्रक्रियेच्या भवितव्याबद्दलचं चित्र स्पष्ट होण्याची प्रतीक्षा आहे.