म्यानमार भूकंपानंतर बँकॉकमधील गगनचुंबी इमारतीच्या गच्चीवर अडकलं कोरियन कुटुंब, सुरक्षिततेची माहिती व्हायरल

म्यानमार :- म्यानमार शुक्रवारी दोन शक्तिशाली भूकंपाने हादरलं. बँकॉकमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले असून, त्याची तीव्रता दाखवणारा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एका एक्स युजरने शेअर केलेल्या व्हिडीओत गगनचुंबी इमारतीच्या गच्चीवर कोरियन कुटुंब आपल्या लहान बाळासह अडकल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. कुटुंब पूर्णपणे भेदरलं असून, लहान बाळही रडत असल्याचं व्हिडीओत ऐकू येत आहे.
म्यानमारला 7.7 आणि 6.4 रिश्टर स्केल तीव्रतेचे दोन भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंप आला असताना एक कुटुंब इमारतीच्या गच्चीवर अडकल होतं. भूकंपामुळे इमारतदेखील हालत होती. गच्चीवर असणाऱ्या पुलातील पाणी समुद्राच्या लाटांप्रमाणे उसळत असल्याचं पाहूनच भूकंप किती तीव्र असेल याची कल्पना येत आहे.
या एक्स पोस्टमध्ये नंतर हे संपूर्ण कुटुंब सुरक्षित असल्याची माहिती देण्यात आली आहे. “आम्ही आता 31 व्या माळ्यावर आलो आहोत. लहान बाळही सुरक्षित आहे. ते फार शूर आहेत. आम्ही पायऱ्यांवरुन खाली येत असतानाही त्यांनी काही गोंधळ घातला नाही,” असं पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे.
भूकंपाचा धक्का इतका तीव्र होता की बँकॉकमधील अनेक इमारती आणि उंच बांधकामं हादरली. एका व्हिडिओमध्ये भूकंपानंरचं दृश्य किती भयानक होतं याची कल्पना येत आहे.
काही उंच इमारतींवर असणाऱ्या स्विमिंग पूलमधील पाणी खाली कोसळत होतं.ज्यामुळे एखाद्या भयानक धबधब्याचा आभास निर्माण झाला होता. बँकॉक, शहरातील सरकारी कार्यालयांसाठी बांधकाम सुरू असलेली 30 मजली गगनचुंबी इमारत कोसळली आणि त्यात 43 कामगार अडकले, असे वृत्त एएफपी वृत्तसंस्थेने दिले आहे. भूकंपाचे केंद्र मध्य म्यानमारमधील मोन्यवा शहरापासून सुमारे 50 किलोमीटर पूर्वेला होते.