50 लाखांचा सायबर फ्रॉड: वृद्ध दांपत्याने आत्महत्या केली, मंत्रालय कनेक्शनचा खुलासा

सायबर चोरांनी फसवणूक केल्याने एका वृद्ध दांपत्याने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्नाटकमधील बेळगावमध्ये राहणाऱ्या या दांपत्याला 50 लाखांचा गंडा घालण्यात आल्यानंतर त्यांनी स्वत:ला संपवलं. नवऱ्याने स्वत:चा गळा चिरुन आत्महत्या केली तर पत्नीने विष प्राण करुन जीवनयात्रा संपवली. या दोघांचीही ओळख पटली असून मयत पुरुषाचे नाव दियांगो नजरत असं होतं. ते 83 वर्षाचे होते. तर त्यांची पत्नी पलवियाना नजरत ही 79 वर्षांची होती. या दोघांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमध्ये कशाप्रकारे त्यांना सायबर गुन्हेगाराने जाळ्यात अडकवून धमकावलं याबद्दल सांगितलं आहे. आपण दिल्ली गुन्हे शाखेतील अधिकारी असल्याचं सांगून आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न सुरु असल्याने आम्ही फार घाबरलो असून स्वत:ला संपवत आहोत असं आत्महत्येपूर्वीच्या चिठ्ठीत लिहिलेलं आहे.
महाराष्ट्र कनेक्शन
पोलिसांनी दिलेल्यामाहितीनुसार, सायबर गुन्हेगारांनी व्हिडीओ कॉलवरुन या दांपत्याशी संपर्क साधला. दोघांचाही गुन्हेगारीमध्ये सहभाग असल्याचा दावा आरोपीने केला. तुमचा मोबाईल क्रमांक आणि ओळखपत्रांचा चुकीच्या पद्धतीने वापर करण्यात आल्याचं सांगत सेटलमेंट फी म्हणून 5 लाख रुपयांची मागणी सायबर गुन्हेगाराने केली. दियांगो आणि पलवियाना हे दोघेही निवृत्त सरकारी अधिकारी असून ते पूर्वी महाराष्ट्रातील सचिवायलायामध्ये कामाला होते.
कोणालाच सांगितलं नाही
सायबर गुन्हेगारांनी अनेकदा फोन करुन भीती दाखवून या दोघांकडून 50 लाख रुपये उकळले. या जोडप्याच्या जवळचे कोणतेही नातेवाईक नसल्याने ते दोघेच राहत होते. त्यांना संततीही नसल्याने ही सारी बाब त्यांनी कोणालाच सांगितली नाही. सुरुवातीला पोलिसांना या दोघांचे मृतदेह सापडेल तेव्हा ही हत्या वाटली होती. मात्र आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतून खऱ्या कारणाचा खुलासा झाला. पोलिसांनी या दोघांचे मोबाईल ताब्यात घेतले असून कॉल रेकॉर्डवरुन तपास सुरु करण्यात आला आहे. दोघांचे मृतदेह बेळगावमधील रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
बँक तपशील पोलिसांच्या हाती
“आम्ही त्यांच्या बँक खात्याचे तपशील गोळा करत असून एकूण किती पैसा या दोघांनी ट्रान्सफर केला याची माहिती मिळवण्याचं काम सुरु आहे. हे प्रकरण फार गंभीर असून याचा सखोल तपास केला जात आहे,” असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.
डिजीटल अरेस्टचे प्रकार वाढले
हल्ली डिजीटल अरेस्टच्या माध्यमातून वयस्कर लोकांना अधिकारी असल्याचं भासवून आर्थिक गंडा घालण्याचे प्रकार फार वाढले आहेत. असं काही घडल्यास आधी घरच्यांना किंवा थेट पोलिसांना याबद्दलची माहिती द्यावी.