अविनाश जाधव यांच्या फोटोला मनसेच्या कार्यकर्त्यांनीच काळं फासलं, पालघरमधील वाद चव्हाट्यावर

मुंबई : एकीकडे मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याची जोरदार तयारी सुरू असताना दुसरीकडे पालघरमधील मनसेतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. मनसैनिकांना गुढीपाडवा मेळाव्यासाठी आवाहन करणाऱ्या बॅनरवरील मनसे नेते अविनाश जाधव यांच्या फोटोला काळ फासण्यात आलं आहे. पालघरच्या बोईसर मधील ओसवाल परिसरात लागलेल्या बॅनरवरील फोटोला हे काळं फासण्यात आलं आहे. विशेष म्हणजे काही मनसे पदाधिकाऱ्यांनीच हे काळं फासल्याची माहिती समोर येत आहे.
विधानसभेनंतर पालघर मनसेत वाद
विधानसभा निवडणुकीनंतर पालघर मनसेमधील वाद चव्हाट्यावर आला होता. पालघरची जबाबदारी अविनाश जाधव यांच्याकडे होती. पण त्यांनी त्यांचं काम व्यवस्थित केलं नसल्याचा आरोप करत पालघरच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर पालघरचे मनसे जिल्हाध्यक्ष समीर मोरे यांना जबर मारहाण करत त्यांचे बंधू आतिश मोरे यांच्यावर पंधरा ते वीस मद्यधुंद अवस्थेत असलेल्या गावगुंडानी धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यामागे अविनाश जाधव हेच असल्याचा समीर मोरे यांच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला होता.
मनसे नेते अविनाश जाधव यांनी निवडणूक काळात दिलेली जबाबदारी पार पाडली नसल्याची तक्रार राज ठाकरे यांच्याकडे केल्यानंतर राज ठाकरे यांनी अविनाश जाधव यांची कानउघाडणी केली. नेमका हाच राग मनात धरून अविनाश जाधव यांनी हा हल्ला केल्याचं मोरे यांच्या सहकाऱ्यांकडून सांगण्यात आलं होतं. त्यामुळेच अविनाश जाधव यांच्या नावाला पालघरमधील काही कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे.
मनसेच्या मेळावा बॅनरवर अविनाश जाधव यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचे फोटो आहेत. पण फक्त अविनाश जाधव यांच्याच फोटोला काळं फासण्यात आलं आहे. त्यामुळे पालघरमधील वादावर आता राज ठाकरे काय निर्णय घेणार, पदाधिकाऱ्यांचे कान टोचणार का हे पाहावं लागेल.
मनसेचा गुढीपाडवा मेळावा आज
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाडवा मेळावा पार पडत असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे या पाडवा मेळाव्याच्या निमित्ताने मनसैनिकांशी संवाद साधणार आहेत. गुढीपाडवा नव्या शुभारंभाचा असं टीजरमध्ये सांगत हिंदुत्व, मराठी अस्मिता, सध्याच्या राजकीय पक्षांच्या भूमिका, नागपूर दंगल, महापुरुषांच्या अवमान प्रकरण, औरंगजेब कबर, मराठी आणि इतर भाषिक वाद अशा अनेक प्रश्नांवर राज ठाकरे बोलण्याची शक्यता आहे. सोबतच पक्षांतर्गत कार्यकारणी मध्ये केलेले बदल आणि पुढील राजकीय भूमिका नेमकी मनसे पक्षाची काय असणार यावर सुद्धा राज ठाकरे भाष्य करतील.