ओडिसामध्ये रेल्वेचा भीषण अपघात; कामाख्या एक्स्प्रेसचे 11 AC डबे रुळावरून घसरले,

ओडिशा : गेल्या काही महिन्यांमध्ये देशभरात रेल्वे अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मात्र, आज ओडिशामध्ये एक मोठा रेल्वे अपघात टळला आहे. एसएमव्हीटी बेंगळुरू-कामाख्या एसी सुपरफास्ट एक्स्प्रेस (12551) चे 11 डबे रुळावरून घसरले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही तसेच कोणीही जखमी झालेले नाही.
अपघात कसा घडला?
आज सकाळी 11:54 वाजता ईस्ट कोस्ट रेल्वेच्या खुर्दा रोड विभागातील कटक-नारागुंडी रेल्वे विभागात हा अपघात घडला. बेंगळुरूहून गुवाहाटीच्या दिशेने जाणारी कामाख्या एक्स्प्रेस चौद्वार भागातील मांगुली पॅसेंजर हॉल्टजवळ घसरली. प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली.
त्वरित बचावकार्य
घटनास्थळी रेल्वेचे पथक पोहोचले असून मदत आणि बचावकार्य वेगाने सुरू आहे. अपघातग्रस्त रिलीफ ट्रेन आणि मेडिकल रिलीफ ट्रेनही घटनास्थळी पाठवण्यात आल्या. बचावकार्यासाठी एनडीआरएफ, वैद्यकीय पथके आणि अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत. रेल्वे अधिकाऱ्यांनी प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलवले आहे.
हेल्पलाइन क्रमांक जारी
रेल्वेने प्रवासी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे – 8991124238. या क्रमांकावरून अपघाताबाबत अधिक माहिती मिळवता येईल.
कोणकोणत्या गाड्यांचे मार्ग वळवले?
अपघातामुळे काही गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले आहेत.
- 12822 धौली एक्सप्रेस
- 12875 नीलाचल एक्सप्रेस
- 22606 पुरुलिया सुपरफास्ट एक्सप्रेस
मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांची प्रतिक्रिया
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सांगितले की, “मला ओडिशातील कामाख्या एक्स्प्रेसशी संबंधित घटनेची माहिती मिळाली आहे. आसाम सीएमओ ओडिशा सरकार आणि रेल्वेच्या संपर्कात आहे. परिस्थिती लवकरच पूर्वपदावर येईल.”
रेल्वे प्रशासनाची प्रतिक्रिया
ईस्ट कोस्ट रेल्वेचे सीपीआरओ अशोक कुमार मिश्रा यांनी सांगितले की, “आतापर्यंत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही आणि सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत आणि या अपघाताचे कारण लवकरच स्पष्ट होईल.”
रेल्वे प्रशासनाने परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना सुरू केल्या आहेत. रेल्वे वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.