धक्कादायक! बीड हादरलं; ईदआधी मशिदीत स्फोट

बीड: बीडच्या गेवराई तालुक्यातील अर्धामसला गावातील मशिदीमध्ये झालेल्या स्फोटाने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. रमजान ईदच्या काही तास आधी, पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे.
घटनास्थळी पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांनी तातडीने धाव घेतली असून बॉम्ब शोधक पथक आणि फॉरेन्सिक टीमने तपासाला सुरुवात केली आहे. या घटनेत मशिदीच्या फरशीला आणि बांधकामाला तडे गेले असून परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
दोन संशयित ताब्यात
स्फोटानंतर पोलीस विभागाने त्वरीत हालचाल करत दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. अज्ञात माथेफिरूने हे कृत्य केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस घटनेच्या मागील नेमके कारण शोधण्यासाठी सखोल तपास करत आहेत.
विशेष पोलिस महानिरीक्षकांची भेट
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता विशेष पोलिस महानिरीक्षक (आयजी) वीरेंद्र मिश्र यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच पोलीस अधीक्षक नवनीत कावत सकाळपासून घटनास्थळी ठाण मांडून आहेत. स्फोटामागील सत्य उघड करण्यासाठी पोलीस यंत्रणा कसून तपास करत आहे.
बीडमध्ये मागील घटनांचा संदर्भ
गेल्या काही महिन्यांत बीड जिल्हा विविध कारणांनी चर्चेत राहिला आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यातच रमजान ईदच्या काही तास आधीच मशिदीत स्फोट झाल्याने वातावरण अधिक तणावपूर्ण झाले आहे.
नागरिकांना शांततेचं आवाहन
पोलीस प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आणि शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. तपास पूर्ण होईपर्यंत कोणत्याही निष्कर्षावर पोहोचू नये, असंही पोलिसांनी सांगितलं आहे.
घटनास्थळी नमुने जमा करण्यात आले असून त्यांची फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे. पुढील तपशील अधिकृत अहवालानंतरच समोर येईल.