महाराष्ट्रावर पुन्हा मोठं संकट, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

पुणे: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असून, काही भागांमध्ये उन्हाच्या झळा अधिक जाणवत आहेत. चंद्रपूरमध्ये उष्णतेचा उच्चांक नोंदवण्यात आला आहे. दुसरीकडे, राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाल्याने मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात विजांसह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
लातूर-सांगलीत अवकाळी पाऊस
लातूर आणि सांगलीमध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पावसामुळे काही ठिकाणी हवामानात गारवा निर्माण झाला असला, तरी विदर्भात मात्र उष्णतेची लाट कायम आहे. नागरिकांनी उष्णतेपासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गुढीपाडव्याला अवकाळी पावसाची शक्यता
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी काही भागांना अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगावी.
विदर्भात तापमानाचा उच्चांक
ब्रह्यपुरीत ४२.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, गोदिंया, जेऊर, सोलापूर, अमरावती, भंडारा आणि गोदिंया येथे पारा ४० अंशांच्या घरात पोहोचला आहे. ढगाळ हवामानामुळे उकाडा अधिक जाणवत असून, नागरिक त्रस्त झाले आहेत.
मुंबई आणि पुण्यात तापमान सामान्य
मुंबईत आकाश मुख्यतः निरभ्र राहणार असून, कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. पुण्यातही तापमान सामान्य राहणार आहे. मात्र, खानदेशात पारा वाढण्याची शक्यता आहे.
होळीनंतर वाढणार उन्हाचा त्रास
मार्च महिन्याच्या सुरुवातीस हवामान खात्याने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला होता. त्यानंतर अवकाळी पावसाने दिलासा दिला असला तरी पुढील काही दिवस उन्हाचा त्रास वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांनी पुरेशी द्रवपदार्थांचे सेवन करावे आणि उष्णतेपासून बचावासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.