राजश्री मुंडेंसोबत यांचं नातं कसं होतं? करूणा शर्मा म्हणाल्या, आमचं ठरलेलं, दोघींनी मिळून सगळा संसार चालवायचा अन्…

राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांना वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने करुणा शर्मा यांना दर महिन्याला दोन लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले होते. आपण धनंजय मुंडे यांच्या पत्नी आहे, असा दावा करुणा शर्मा यांनी केला होता. या प्रकरणी धनंजय मुंडे यांनी वरच्या कोर्टात धाव घेत पोटगीला स्थगिती देण्यासाठी याचिका दाखल केली. दाखल केलेल्या याचिकेवरती काल (शनिवारी, 29 मार्च 2025) माझगाव सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी धनंजय मुंडे यांचा करुणा शर्मासोबत झालेलं लग्न हे अधिकृत नाही. धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांच्याशी अधिकृत लग्न केलंच नाही, असा युक्तिवाद धनंजय मुंडे यांच्या वकीलांनी केला. तर पुरावे सादर करण्यासाठी त्यांनी काही वेळ कोर्टाकडे मागून घेतला आहे, या दरम्यान करूणा शर्मा यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांची भेट कशी झाली, प्रेम कसं झालं आणि इतर गोष्टीबाबत माहिती सांगितली. यावेळी त्यांनी राजश्री मुंडेंसोबत यांचं नातं कसं होतं? त्याबद्दल देखील स्पष्टपणे भाष्य केलं आहे.
राजश्री मुंडे आणि करुणा शर्मा यांच्यातलं नातं कसं आहे?
धनंजय मुंडेंच्या पत्नी राजश्री मुंडे आणि तुमच्यातील नातं कसं आहे? यावर करुणा शर्मा म्हणाल्या की, राजश्रीची आणि माझी अनेक वेळा भेट झालेली आहे. आमच्या दोघींचं नातं चांगलं होतं, आमच्यात कसलेही प्रॉब्लेम्स नव्हते. दोघींनी मिळून सगळा संसार चालवायचा आणि धनंजय मुंडेंना सांभाळायचं, असं ठरलं होतं. आमच्या सुखी संसाराला कोणाची तरी नजर लागली. माझा नवरा कर्तृत्ववान आणि चांगला होता. परंतु आजूबाजूच्या काही लोकांनी त्यांना घेरलं आणि संकटं आली. माझा लढा हा जिंकेपर्यंत सुरुच राहणार आहे. मी त्यांची पहिली पत्नी आहे. आमचं एचडीएफसी बँकेमध्ये ज्वॉईंट अकाऊंट देखील आहे, त्यांची एक कोटी रुपयांची पॉलिसी आहे, त्यासाठी मी नॉमिनी आहे. माझ्या सगळ्या कागदपत्रांवर करुणा धनंजय मुंडे असंच नाव आहे.
धनंजय मुंडे-करुणा शर्मा धडकले अन् प्रेमात पडले
धनंजय मुंडे यांना मी भेटले तेव्हा माझं वय 16 वर्षे इतकं होतं. इंदौरमध्ये असलेल्या भैय्यू महाराजांच्या आश्रमामध्ये आमची पहिल्यांदा भेट झाली होती. गोपीनाथ मुंडेंसह महाराष्ट्रातले अनेक मंत्री, दिग्गज नेते इंदौरच्या त्या आश्रमामध्ये येत होते. आता त्या महाराजांचा मृत्यू झाला, त्यांनी आत्महत्या केली. मी त्या आश्रममध्ये जात देखील नव्हती, कारण माझा या गोष्टींवर विश्वास नाही. एकदा मी माझ्या आईसोबत गेली असता त्यांची आणि माझी टक्कर झाली आणि आमची ओळख झाली. मी आईसोबत भय्युजी महाराजांच्या आश्रमामध्ये गेले होते, त्यावेळी धनंजय मुंडे आणि माझी टक्कर झाली आणि अपघाताने मी धनंजय मुंडेंच्या प्रेमात पडले. आमच्या नात्याबद्दल गोपीनाथ मुंडेंना सगळं माहिती होतं. माझ्या लग्नाच्या वेळी खूप अडचणी आल्या. धनंजय मुंडेंनी माझ्या आईकडे माझ्यासाठी लग्नाची मागणी घातली होती. परंतु माझे घरचे तयार नव्हते. तरीही आम्ही इंदौरमध्ये लग्न केल्याचंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं.
धनंजय मुंडे आणि माझं लग्न होणार होतं, लग्नाअगोदर मी प्रेग्नंट होते. लग्नाला जात असताना शंभर ते दीडशे गुंडांनी आणि पोलिसांनी आमची गाडी अडवली होती. अनेक वेळा आमच्या लग्नात अडचणी आल्या. त्यानंतर पुढे आमचं लग्न झालं.ते माझ्यावर खूप प्रेम करत होते. ते पुण्यातून माझ्यासाठी इंदौरला आठवड्यातून दोन वेळा यायचे. लग्नानंतर मी त्यांच्या कुटुंबियांना भेटलेले होते. पुढे त्यांनी मला आई-वडील वारल्याचं सांगितलं, असंही पुढे करुणा शर्मा म्हणाल्या.
पन्नास कोटींची होती ऑफर
धनंजय मुंडे आणि माझ्यातील दोघांमधला वाद मिटवून घेण्यासाठी आणि लिव्ह-इन-रिलेशनशीप मान्य करण्यासाठी धनंजय मुंडे यांनी मला 50 कोटी रुपयांची ऑफर दिली होती, असा दावा करुणा शर्मांनी केला आहे. परंतु आपण वकिलांकडून सगळी कागदपत्र वाचली आणि त्यासाठी नकार दिला, असं त्यांनी या मुलाखतीवेळी सांगितलं आहे.