सट्टेबाजांचे रॅकेट जालन्यात उद्ध्वस्त, साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त

जालना: आयपीएल सट्टेबाजीवर पोलिसांचा धडाका, माजी नगरसेवकासह १६ जणांवर कारवाई
जालना : आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा चालवणाऱ्या रॅकेटवर पोलिसांनी मोठी कारवाई केली असून, तब्बल साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यावेळी एका माजी नगरसेवकासह काही राजकीय नेत्यांच्या जवळच्या नातेवाइकांना रंगेहाथ पकडण्यात आले. पोलिसांनी एकूण १६ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे.
खोतकरांच्या आरोपानंतर पोलिसांची अॅक्शन
आमदार अर्जुन खोतकर यांनी विधानसभेत थेट आरोप करत, “आयपीएल सट्टेबाजांकडून पोलिस हप्ते घेतात,” असा गंभीर दावा केला होता. त्यांच्या आरोपांनंतर पोलिसांनी अॅक्शन मोडमध्ये येत तात्काळ कारवाईला सुरुवात केली.
सट्टेबाज रॅकेट उद्ध्वस्त
‘चेन्नई सुपर किंग्स – रॉयल चॅलेंजर बेंगळुरू’ सामन्यादरम्यान क्रिकेट सट्टा लावणाऱ्या पाच सट्टेबाजांना जालना आणि हिंगोली येथून ताब्यात घेण्यात आले. यामध्ये अश्विन ऊर्फ गोविंद वीरेंद्र गुप्ता, सचिन विजयराज जैन, विशाल राजेंद्र बनकर, संतोष नामदेव लहाने आणि मुस्तकीन शेख वजीर यांचा समावेश आहे.
१६ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
याशिवाय आयपीएल सट्टेबाजांच्या विरोधातील मोहिमेअंतर्गत १६ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. त्यामध्ये अश्विन गुप्ता, आनंद राधाकिसन मंत्री, दिनेश बनकर, शेख नदीम शेख नसीर, गजानन बनकर, सुनील शिंदे, विजय नरसाळे, अमित रठ्ठैया, विनोद रठ्ठैया, शेख नजीर शेख इब्राहिम, रूपेश घोडके, सोनू चौधरी, विनोद भगत, जीवन भगत, सूरज काबलिये आणि दीपक तोडकर यांचा समावेश आहे. या सर्वांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांचा निर्धार
जालना जिल्हा पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलिस अधीक्षक आयुष्य नोपाणी, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक प्रशांत जाधव, पोलिस निरीक्षक राजपूत आणि कृष्णा तंगे यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली. पोलिसांच्या या धडक कारवाईनंतर सट्टेबाजांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
सट्टेबाजीविरोधात कठोर पावले
आयपीएल हंगाम दरम्यान सट्टेबाजीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. स्थानिक प्रशासनाकडून नागरिकांनाही सट्टेबाजीविरोधात सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.