Myanmar Earthquake : भूकंपामुळे म्यानमारमध्ये हाहाकार, मृतांची संख्या 1644 वर, भारताकडून ऑपरेशन ब्रह्माला सुरुवात

28 मार्च रोजी म्यानमार येथे मोठा भूकंप झाला, या महाकाय भूकंपामुळे हाहाकार उडाला असून यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांचा आकडा 1644 वर पोहोचला आहे. काही संस्थांनी हा मृत्यूचा आकडा 10 हजारांपर्यंत पोहोचू शकतो अशी शक्यता वर्तवली आहे. म्यानमार सरकारच्या माहितीनुसार तीन हजाराहून अधिक लोक यात जखमी झाले असून 139 लोक अद्याप बेपत्ता आहेत. म्यानमार येथील भूकंपग्रस्तांना मदत करण्यासाठी भारताकडून ऑपरेशन ब्रह्मा सुरु करण्यात आलं असून भारतीय बचाव पथक तेथे दाखल झालं आहे.
मृतांचा एकदा 10 हजारपर्यंत पोहोचण्याची शक्यता :
बीबीसीच्या वृत्तानुसार, म्यानमारच्या लष्करी नेतृत्वाने सध्याच्या घडीला भूकंपामुळे देशातील मृतांची संख्या 1,644 झाली असल्याचे सांगितले आहे. तर जवळपास 3,408 लोक यात जखमी आहेत. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, युनायटेड स्टेट्स जिऑलॉजिकल सर्व्हेने म्यानमारमध्ये मृतांची संख्या 10,000 पेक्षा जास्त होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. म्यानमारमधील भूकंपामुळे सर्वाधिक प्रभावित झालेले क्षेत्र मंडाले, बागो, मॅग्वे, उत्तर-पूर्व शान राज्य, सागाइंग आणि नायपीडाव आहेत. तर यंगून-मंडाले महामार्गाचे खूप नुकसान झाले असल्याने मदत कार्यात अडचणीत येत आहेत.
भारताकडून ऑपरेशन ब्रह्मा :
म्यानमारमधील भूकंपग्रस्त लोकांची मदत करण्यासाठी भारताकडून ऑपरेशन ब्रह्मा मोहीम सुरु करण्यात आली आहे. भूकंपग्रस्त लोकांची मानवतावादी मदत करण्यासाठी ही मोहीम असून या अंतर्गत तंबू, ब्लँकेट, स्लीपिंग बॅग, फूड पॅकेट, स्वच्छता किट, जनरेटर आणि आवश्यक औषधांसह 15 टन मदत सामग्री भारताकडून यंगूनला पाठवण्यात आली आहे. भारतीय नौदलाची जहाजे INS सातपुडा आणि INS सावित्री जवळपास 40 टन सामग्री घेऊन मदत घेऊन यंगून बंदराच्या दिशेने निघाली आहेत. भारतासह न्यूझीलंडने देखील म्यानमारला दोन दशलक्ष न्यूझीलंड डॉलर्सची मदत जाहीर केली आहे. तर चीन आणि रशियानेही मदतकार्यात पुढाकार घेतला आहे.