‘धर्माचं मला सांगूच नका!’ म्हणत राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील प्रदूषित नद्यांची यादीच वाचून दाखवली

गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरेंची पर्यावरणावर परखड भूमिका; कुंभमेळा आणि नदीप्रदूषणावर टीका
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्यात पर्यावरण आणि नदीप्रदूषणावर परखड भूमिका मांडली. कुंभमेळ्यानंतर गंगा नदीतील प्रदूषणासह महाराष्ट्रातील नद्यांची दयनीय स्थिती त्यांनी ठळकपणे मांडली. राज ठाकरे यांनी सरकारच्या अपयशावर आणि धर्माच्या नावाखाली होणाऱ्या पर्यावरणीय विनाशावर रोखठोक भाष्य केलं.
कुंभमेळ्यावरून पर्यावरणीय चिंता
राज ठाकरे म्हणाले, “कुंभमेळ्यानंतर गंगेत स्नान केलेल्या लाखो लोकांना आरोग्याच्या समस्या उद्भवल्या. प्रश्न कुंभमेळ्याच्या अपमानाचा नाही, तर गंगा स्वच्छतेचा आहे.” त्यांनी सांगितलं की गंगा शुद्धीकरणासाठी 33 हजार कोटी रुपये खर्चूनही नदीचं प्रदूषण कमी झालेलं नाही.
महाराष्ट्रातील नद्यांची गंभीर अवस्था
“महाराष्ट्रातील 55 नदीपट्टे अत्यंत प्रदूषित आहेत. सावित्री, उल्हास, मिठी, मुळा-मुठा, भीमा, पवना, कृष्णा, तापी, गिरणा, आणि वैनगंगा यांसारख्या नद्यांचं पाणी प्रचंड दूषित झालं आहे,” असं राज ठाकरे म्हणाले. मुंबईतील मिठी नदीची दुरवस्था आणि महानगरपालिकेच्या अपयशावरही त्यांनी टीका केली.
धर्म आणि पर्यावरणावर परखड मत
“धर्म आपल्या जीवनाचा भाग असला तरी पर्यावरणाच्या रक्षणाला दुय्यम स्थान दिलं जातं. विद्युतदाहिन्या उपलब्ध असताना अनेक लोक अजूनही लाकडांवर अंत्यसंस्कार करतात, यामुळे मोठ्या प्रमाणात जंगलतोड होते,” असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.
सरकारला सल्ला
राज ठाकरे यांनी सरकारला आवाहन केलं की, पर्यावरणाच्या रक्षणासाठी तात्काळ कठोर पावलं उचलावीत. “धर्माच्या नावाखाली निसर्गाची हानी सहन केली जाणार नाही,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं.