नमाज पठण सुरु असताना एकाच वेळेस 700 जणांचा मृत्यू; म्यानमारमधील भूकंपातील मृतांचा आकडा धडकी भरवणारा

म्यानमार: नमाज पठण सुरु असताना एकाच वेळेस 700 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. म्यानमारमधील भूकंपातील मृतांचा आकडा 1700 च्या वर पोहचला आहे. म्यानमारमध्ये झालेल्या भूकंपात 60 हून अधिक मशिदीही उद्ध्वस्त झाल्या आहेत. म्यानमारमध्ये मंडालेजवळ रविवारी पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 5.1 इतकी नोंदवली गेली. शुक्रवारच्या विनाशकारी भूकंपानंतर रविवारी पुन्हा भूकंपाचे धक्के बसल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली.
म्यानमारमधील भूकंपात 3400 हून अधिक लोक जखमी झाले आहेत, तर 300 हून अधिक लोक बेपत्ता आहेत. भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा 1700 वर पोहचला असल्याची माहिती लष्करी सरकारच्या प्रवक्त्याने दिली. म्यानमार आणि थायलंडमध्ये 7.7 तीव्रतेचा भूकंप झाला. 200 वर्षातील सर्वात मोठा भूकंप असल्याचे सांगितले जाते. भूकंपाचा परिणाम 334 अणुबॉम्बच्या स्फोटाइतका होता असे एका वृत्तवाहिनीने एका भूगर्भशास्त्रज्ञाच्या हवाल्याने म्हटले आहे. मृतांचा आकडा 10 हजारांपेक्षा जास्त असू शकतो अशी भिती युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) ने व्यक्त केली आहे.
भारताकडून म्यानमारला मदतीचा हात देण्यात आला आहे. जीवनावश्यक सामान घेऊन भारतीय विमान म्यानमारमध्ये दाखल झाले. भारताने ३ खेपांमध्ये मदत साहित्य पाठवल्याची माहिती परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दिली. भारतीय नौदलाच्या जहाजांनी आयएनएस सातपुरा आणि आयएनएस सावित्री यांनी ऑपरेशन ब्रह्मा अंतर्गत म्यानमारमधील यांगून बंदरात 40 टन मदत साहित्य पाठवले. इतकचं नाही तर 118 सदस्यांचे फील्ड हॉस्पिटल युनिट आग्राहून म्यानमारच्या मंडाले शहरात पोहोचले आहे. ऑपरेशन ब्रह्मा अंतर्गत, भारताने 15 टन मदत साहित्य पाठवले आहे. यामध्ये तंबू, स्लीपिंग बॅग, ब्लँकेट, तयार अन्न, पाणी शुद्धीकरण यंत्र, सौर दिवे, जनरेटर सेट आणि मदतीसाठी आवश्यक औषधे यांचा समावेश आहे.