LIVE STREAM

Latest NewsNagpur

नागपूर येथे वैदिक गणित गुणवत्ता केंद्र सुरू व्हावे; शासन सर्वतोपरी मदत करेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  नागपूर : भारतात विकसित झालेल्या विविध शास्त्रांचा पाया गणितावर आधारित आहे. वैदिक गणिताच्या खंडाद्वारे हे ज्ञान नव्याने समाजासमोर येणार आहे. वैदिक गणिताची महती व उपयोग येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. त्याकरिता भारती कृष्ण विद्या विहार येथे वैदिक गणिताचे गुणवत्ता केंद्र उभारले जावे, अशी अपेक्षा व्यक्त करत यास शासनातर्फे संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

            विश्व पुनर्निर्माण संघ संचालित भारती कृष्ण विद्या विहार शाळेमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आद्य शंकराचार्य कृष्ण तीर्थ महाराज लिखित वैदिक गणिताच्या दोन खंडांचे प्रकाशन झाले. विश्व पुनर्निर्माण संघाचे अध्यक्ष प्रफुल्लकुमार काळे, सरचिटणीस शैलेश जोगळेकर, संचालक मंडळाचे सदस्य यावेळी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, प्राचीन भारतीय संस्कृतीत अनेक महत्वाची शास्त्र विकसित झाली. मात्र, परकीय आक्रमण आदींमुळे या शास्त्रांतील ज्ञान सर्वांपर्यंत पोहचू शकले नाही.  आद्य शंकराचार्य कृष्ण तीर्थ महाराज यांनी वेद ऋचांचा अभ्यास करून सोप्या पद्धतीने संपूर्ण गणिताची मांडणी वैदिक गणित खंडांमध्ये केली आहे. केंद्रीय माध्यमिक मंडळाच्या इयत्ता पाचवी ते सातवी च्या अभ्यासक्रमात या पुस्तकाचा समावेश करण्यात आला आहे. या खंडांच्या माध्यमातून वेदांमधील ज्ञानाचा साठा शंकराचार्यांनी शोधला आहे. वैदिक गणित ही भारताची महत्वाची, मोठी ज्ञानसंपदा आहे. त्यासंदर्भात संशोधन व संवर्धन होण्याच्या दृष्टीने भारती कृष्ण विद्या विहारामध्ये गुणवत्ता केंद्र उभारले जावे, अशी अपेक्षा श्री.फडणवीस यांनी व्यक्त केली. शिक्षण विभागाद्वारे वैदिक गणित विषय विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी सकारात्मक विचार करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. 

            सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले, मानवी जीवनात अनेक प्रसंगांमध्ये गणना, आकडेवारीचे अनन्यसाधारण महत्व आहे. प्राचीन भारतीय परंपरेतून आलेल्या वैदिक गणिताचा विचार हा विश्व कल्याणासाठी आहे. जगात अध्यात्मावर आधारित  घडत असलेल्या विविध परिवर्तन आणि पुनर्रचनेमध्ये वैदिक गणितही महत्वाची भूमिका निभावू शकते आणि जगाला सुखी व समृद्ध बनविण्यातही मोलाचे योगदान देवू शकते असे त्यांनी सांगतिले.

सांख्यदर्शन, वक्ररचना निर्देशांक यांच्यासह नल-दमयंती आख्यान, महाभारत आदींमधील उदाहरणे देवून त्यांनी गणिताचे महत्व विषद केले.

              विश्व पुनर्निर्माण संघाचे अध्यक्ष प्रफुल्लकुमार काळे यांनी प्रास्ताविक केले तर  सरचिटणीस शैलेश जोगळेकर यांनी आभार मानले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!