मनसेची सत्ता यावी, शिर्डीच्या तरुणाची कोल्हापूर ते शिवतीर्थ पदयात्रा, राज ठाकरेंसमोर लोटांगण

राज ठाकरे यांनी महाराष्ट्र सैनिक प्रमोद आरणे याची शिवतीर्थ येथे भेट देऊन शुभेच्छा दिल्या
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या समर्थकांची राज्यभर मोठी संख्या आहे. महाराष्ट्रात मनसेची सत्ता यावी, यासाठी शिर्डी येथील प्रमोद आरणे या मनसे कार्यकर्त्याने कोल्हापूरातील महालक्ष्मी मंदिरापासून मुंबईतील शिवतीर्थपर्यंत पायी पदयात्रा केली. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेत लोटांगण घातले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
शिर्डीच्या तरुणाची पदयात्रा
राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रमोद आरणे यांनी कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी मंदिरातून शिवतीर्थ, दादरपर्यंत 380 किलोमीटरची पदयात्रा केली. या पदयात्रेला त्यांनी “पक्षध्वज पायी संकल्प यात्रा” असे नाव दिले. राज ठाकरे यांनीही शिवतीर्थ येथे प्रमोद आरणे यांची भेट घेऊन त्यांचे कौतुक केले. याबाबत मनसे नेते अमित ठाकरे यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.
भाजपला मनसेचा पाठिंबा
गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले. त्यांनी विधानसभा निवडणुकीसंदर्भात भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले. “महाराष्ट्रासारखे सुसंस्कृत राज्य तुमच्या हातात आहे. जर तुम्ही मराठी माणसांचे हित डोळ्यासमोर ठेवून काम करणार असाल, तर आमचा पाठिंबा नक्कीच राहील,” असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
सोशल मीडियावर चर्चेचा विषय
प्रमोद आरणे यांच्या या पदयात्रेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अनेकांनी त्यांच्या निष्ठेचे आणि समर्पणाचे कौतुक केले आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांमध्येही यामुळे नवचैतन्य निर्माण झाले आहे.
शिर्डी ते शिवतीर्थ पदयात्रा आणि राज ठाकरेंच्या भेटीचा हा प्रसंग महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.