लव्ह मॅरेजवाली बायको, मित्राच्या मदतीने उपजिल्हाधिकारी पतीला संपवण्याचा डाव; संभाजीनगर प्रशासनात खळबळ

सातारा : छत्रपती संभाजीनगर शहरातून धक्कादायक घटना समोर आली असून पत्नीने आपल्या मित्राच्या मदतीने चक्क उपजिल्हाधिकारी पतीलाच ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. पत्नीने आई, भाऊ, घरातील मोलकरीण आणि मित्राच्या मदतीने उपजिल्हाधिकारी असलेल्या पतीला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. देवेंद्र कटके अस उप जिल्हाधिकारी यांचं नाव असून जादूटोणा करून विषप्रयोग करत जातीवाचक शिवीगाळही केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय बंदूक रोखून देवेंद्र कटके यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला असून या प्रकरणी सातारा पोलिसांत (Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत, पतीच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, याप्रकरणातील प्रमुख आरोपी उबाळे हा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा निकटवर्तीय असून त्यांचे सोशल मीडिया अकाऊंट चालवत असल्याची माहिती आहे.
पत्नीविरोधात देवेंद्र कटके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, देवेंद्र कटकरे यांचा 2000 साली सारिका साहेबराव देशमुख हिच्यासोबत आंतरजातीय प्रेमविवाह केला. सारिकाने एमपीएससी परीक्षेत लाभ घेण्यासाठी अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र काढण्याचा हट्ट धरला. मात्र, लग्नानंतर पत्नीला लाभ देणे शासनाने बंद केल्याचे देवेंद्र यांनी पत्नीला सांगितले. त्यानंतर सारिका उद्धटपणे वागू लागली. 2013 मध्ये कटके यांची संभाजीनगर येथे उपजिल्हाधिकारीपदी पदोन्नती झाली. त्यामुळे ते सारिका, दोन मुलांसह जालाननगर येथे राहण्यास आले. मात्र, कटके आणि मुलांशी सारिका तुच्छतेने वागू लागली. अश्लील शिवीगाळ करून आरडाओरड करून भांडण करायची, मुलांकडे पाहून कटके हे शांत राहिले. 2015 साली सारिकाच्या एका कृत्यामुळे कटके यांना मोठा धक्का बसला होता. त्यानंतर सासरच्यांच्या माफीमुळे ते प्रकरण मिटले. तर, 2019 मध्ये देवेंद्र हे मुंबईत ड्यूटीवर होते, तेव्हा कोविडमुळे त्यांनी सारिका आणि लहान मुलाला संभाजीनगरातच ठेवले. मोठा मुलगा आयआयटी मुंबईत शिकत होता.
2021 मध्ये सारिकाने शाळा सुरू करण्याबाबत पतीकडे हट्ट धरल्याने जालना जिल्ह्यातील बोरखडी शिवारात पत्नीला ग्रिनलँड इंग्लिश स्कूल सुरू करून दिले. त्याचा संपूर्ण खर्च देवेंद्र यांनी केला. शाळेच्या जवळच आरोपी विनोद उबाळेचे सद्गुरु सदानंद नावाचे हॉटेल होते, त्याने आधी कटके यांच्याशी ओळख वाढविली. त्यानंतर शाळेच्या कार्यक्रमात जेवणाच्या ऑर्डर घेत असल्याने तो सारिकाचाही मित्र बनला. 2023 मध्ये देवेंद्र यांची संभाजीनगर येथे उपजिल्हाधिकारी निवडणूक या पदावर बदली झाली. मात्र, सारिकाचे वागणे आणखीनच विचित्र झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान,देवेंद्र कटके यांची कार एमएच-21-एएक्स-0105 सारिका वापरते, पण सुरक्षेसाठी कारला त्यांनी जीपीएस लावले होते. सारिका नियमित रस्त्याने न जाता वेगळ्या मार्गान जात असल्याने त्यांनी 3 मार्च रोजी कारच्या लोकेशनवर गेले. रात्री साडेआठ वाजता केंम्ब्रिज चौकात सारिकाच्या कारजवळ दुसरी कार एमएच 21-बीयू-8111उभी होती. ती कार विनोद उबाळे वापरत असल्याचे कटके यांना माहिती होते. तिथे देवेंद्र यांनी विचारणा करताच उबाळेने त्यांना जातीवाचक शिवीगाळ करून त्यांच्यावर थेट पिस्तूल रोखून आडवा आलास तर उडवून टाकील, अशी धमकी दिली होती.
दरम्यान, उपजिल्हाधिकारी देवेंद्र तुकाराम कटके यांच्या तक्रारीवरून पत्नी सारिका देवेंद्र कटके, मित्र विनोद कैलास उबाळे, मेव्हणा आतिश साहेबराव देशमुख, सासू सुवर्णा साहेबराव देशमुख, मोलकरीण छायाबाई बालाजी गायकवाड, यांच्या विरोधात सातारा पोलिस ठाण्यात अॅट्रॉसिटी, जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, शस्त्राधिनियम, जादूटोणा प्रतिबंधक कायदा यासह अन्य कलमानुसार 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलिस आयुक्त रणजित पाटील करीत आहेत.