LIVE STREAM

Latest NewsMaharashtra

सागरी व्यापार क्षेत्राचा समग्र विकास आवश्यक – राज्यपाल सी पी राधाकृष्णन

मुंबई  : जगातील  90% व्यापार आजही सागरी मार्गाने होतो. समुद्र मार्गाने होणारा व्यापार हा भारतीय व्यापार तसेच अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे सन 2047 पर्यंत विकसित भारताचे लक्ष्य गाठण्यासाठी सागरी क्षेत्राचा समग्र विकास होणे अतिशय आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केले.

सागरी व्यापार क्षेत्रातर्फे साजरा केल्या जाणाऱ्या 62 वा राष्ट्रीय सागरी दिवसाचे तसेच मर्चंट नेव्ही सप्ताहाचे उदघाटन राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन येथे झाले, त्यावेळी ते बोलत होते. 

यावेळी नौवहन महासंचालक श्याम जगन्नाथन यांनी राज्यपालांच्या जॅकेटला राष्ट्रीय सागरी दिनाच्या ध्वजाची प्रतिकृती लावली तसेच राज्यपालांना स्मृतिचिन्ह व कॉफी टेबल पुस्तक भेट दिले. 

अनेक शतकांपूर्वी भारताचा समुद्री व्यापार क्षेत्रात मोठा दबदबा होता. सम्राट राजेंद्र चोला यांचे नौदल शक्तिशाली होते व आपल्या काळात त्यांनी इंडोनेशिया, कंबोडिया, थायलंड, लाओस, बर्मा आदी देशांपर्यंत व्यापार वाढवला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी नौदलाचे महत्त्व ओळखून सशक्त नौदल उभारले होते, असे राज्यपालांनी सांगितले.

आज व्यापाऱ्यांना कमी वेळात आपला माल गंतव्य ठिकाणी पोहोचवायचा असतो. ग्राहक हा आज राजा आहे. त्यामुळे कंटेनरमध्ये माल  ठेवणे व उतरवणे हे वेळेत झाले पाहिजे. या दृष्टीने नौवहन संचालनालय व शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांनी कंटेनर कॉर्पोरेशन, रेल्वे तसेच व्यापारी संघटनांशी चर्चा करून सागरी व्यापार क्षेत्राचे आधुनिकीकरण केले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.

नौवहन संचालनालयाने व्यापारात अडथळे निर्माण होण्यापूर्वीच समस्यांचे आकलन केले पाहिजे व त्यावर परिणामकारक उपाययोजना केल्या पाहिजे, अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.

वाढवण बंदर तयार झाल्यानंतर भारताचा जगातील विविध देशांशी व्यापार लक्षणीय वाढणार आहे. त्यामुळे वाढवण बंदर येथे कोणत्या सुविधा असाव्या या दृष्टीने नौवहन क्षेत्राने सिंगापूर, शांघाय, ऍमस्टरडॅम येथील बंदरांचे अध्ययन करावे व त्यानुसार येथे आधुनिक सुविधा निर्माण कराव्या, असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.

सागरी प्रदूषण कमी होण्याच्या दृष्टीने हरित सागरी जलवाहतूक वाढवण्याच्या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावे असेही आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.

कार्यक्रमाला नौवहन महासंचालनालयाचे मुख्य सर्वेक्षक व अतिरिक्त महासंचालक अजित सुकुमारन, उपमहासंचालक पांडुरंग राऊत, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष कॅप्टन बी के त्यागी, मुख्य जहाज सर्वेक्षक प्रदीप सुधाकर, उपमहासंचालक डॉ सुधीर कोहाकडे, उप नौकानयन सल्लागार कॅप्टन नितीन मुकेश, शिपिंग मास्टर मुकुल दत्ता, कॅप्टन संकल्प शुक्ल, नॅशनल युनिअन ऑफ सीफेअरर्सचे महासचिव मिलिंद कांदळगावकर आदी उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!