रिझर्व्ह बॅंक भारताच्या आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचे प्रतिपादन
मुंबई :- भारताच्या 2047 च्या ‘विकसित भारत’ (Viksit Bharat 2047) ध्येयाच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना, नव्या आव्हानांना तोंड देण्यासाठी नाविन्यपूर्ण आणि समावेशक वित्तीय प्रणाली आवश्यक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी आज मुंबईतील एनसीपीए नरिमन पॉईंट येथे आयोजित रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या 90व्या वर्धापन दिन कार्यक्रमात केले.
रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया (RBI) देशाच्या आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ राहणार असून, डिजिटल व्यवहारांमध्ये भारताला जागतिक नेतृत्व मिळवून देण्यात RBI चा मोठा वाटा आहे, असे राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या, “आरबीआयने बँकिंग प्रणालीला मजबूत करत, वित्तीय नवउपक्रम आणि ग्राहकांचा विश्वास कायम ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे.”
कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, रिझर्व्ह बॅंकेचे गर्व्हनर संजय मल्होत्रा यांची उपस्थिती होती. राष्ट्रपती मुर्मू यांनी आरबीआयच्या 90 वर्षांच्या प्रवासाचे स्मरण करत, संस्थेच्या महत्त्वपूर्ण योगदानाची प्रशंसा केली. 1935 मध्ये स्थापन झालेली आरबीआय देशाच्या विकासाच्या प्रवासात एक पाऊल पुढे राहिली असून, आजही देशाच्या आर्थिक स्थितीचे कणखर आधारस्तंभ म्हणून काम करत आहे.
आरबीआयच्या प्रभावी कार्यामुळे वित्तीय समावेशन, संस्थात्मक उभारणी, महिला सक्षमीकरण आणि डिजिटल वित्तीय प्रणालींमध्ये मोठा बदल घडला आहे. त्यांनी ‘प्रधानमंत्री जनधन योजना’ला दिशा दिली आहे, ज्यात महिलांचा मोठा सहभाग आहे. याशिवाय, युपीआय (UPI) सारख्या नाविन्यपूर्ण प्रणालींमुळे भारत डिजिटल वित्तीय व्यवहारांमध्ये जागतिक नेत्यांमध्ये समाविष्ट झाला आहे.
राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या, “आरबीआयने केवळ बँकिंग सेवा देण्यापलीकडे जाऊन, देशातील आर्थिक प्रणालीला सर्वसमावेशक बनवले आहे.” त्यांनी आर्थिक साक्षरता आणि ग्राहक संरक्षणावर देखील महत्त्व दिले. सायबर सुरक्षा, हरित अर्थव्यवस्था आणि वित्तीय तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी RBI ने पुढाकार घेतला आहे.
गेल्या 90 वर्षांत आरबीआयने महागाई नियंत्रण, वित्तीय समावेशन, आर्थिक स्थैर्य आणि मजबूत आर्थिक वाढ यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. 1990 च्या आर्थिक सुधारणा आणि कोविड-19 महामारीसारख्या संकटांच्या काळात आरबीआयने प्रभावी उपाययोजना केल्या आहेत.
कार्यक्रमाच्या शेवटी, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी आरबीआयच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित करत जागतिक स्तरावर होणाऱ्या गतीमान बदलांच्या पार्श्वभूमीवर आरबीआयने आर्थिक बाबी नियंत्रित करण्यात ठामपणे कामगिरी केली, असे सांगितले. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते विशेष स्टॅम्पचे अनावरणही करण्यात आले.