Nagpur Crime : पत्नीनेच उघड केला पतीचा काळा चेहरा; बलात्कार, ब्लॅकमेलिंगप्रकरणी अटक

नागपूर :- नागपुरात एक धक्कादायक गुन्हा समोर आला आहे, जिथे एका महिलेनेच आपल्या पतीच्या गुन्हेगारी कारवायांचा पर्दाफाश करून त्याला तुरुंगात पाठवले आहे. बलात्कार, ब्लॅकमेलिंग आणि पत्नीचा छळ केल्याप्रकरणी आरोपी अब्दुल शारिक कुरैशी याला पोलिसांनी अटक केली आहे.
पत्नीच्या तक्रारीनुसार, आरोपी इतर महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्यावर बलात्कार करायचा आणि त्यांचे अश्लील फोटो-व्हिडिओ काढून त्यांना ब्लॅकमेल करून पैसे उकळायचा. इतकंच नव्हे, तर तो स्वतःच्या पत्नीवरही अत्याचार करायचा. पत्नीला या गोष्टीचा संशय येताच तिने आपल्या नातेवाईकाच्या मदतीने त्याचा फोन हॅक करून धक्कादायक पुरावे मिळवले.
व्हॉट्सअॅप हॅक करून उघडकीस आले धक्कादायक प्रकार
२४ वर्षीय पीडित पत्नीने जेव्हा आरोपीच्या व्हॉट्सअॅप चॅट्स आणि व्हिडिओ क्लिप्स पाहिल्या, तेव्हा तिला धक्का बसला. त्याचे अनेक महिलांसोबत संबंध होते, त्यात काही अल्पवयीन मुलींचाही समावेश होता. आरोपीने त्यांचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो काढले होते आणि त्यांना धमकावत पैसे उकळत होता. पत्नीने यात पीडित महिलांना पोलिसांत तक्रार देण्यासाठी प्रोत्साहित केले.
१९ वर्षीय पीडितेने पोलिसांत दिली तक्रार
पत्नीने गोळा केलेले पुरावे घेऊन पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर एका १९ वर्षीय पीडित तरुणीने देखील आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. तिने पोलिसांना सांगितले की, आरोपीने आपली ओळख ‘साहिल शर्मा’ म्हणून करून दिली होती. तो तिला लग्नाचे आश्वासन देत होता आणि तिचे पैसे उकळत होता. त्याने तिची सोन्याची अंगठी देखील विकून पैसे घेतले होते.
पोलिसांनी आरोपीस अटक केली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी एकाच वेळी चार ते पाच महिलांसोबत संवाद साधत होता आणि त्यांचा गैरफायदा घेत होता. आरोपीच्या पत्नीच्या धाडसामुळे त्याचा भंडाफोड झाला. पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्कार, ब्लॅकमेलिंग आणि फसवणुकीचे गंभीर गुन्हे दाखल करून त्याला अटक केली आहे.