Nandurbar Accident : साखरपुडा झालेल्या तरुणाचा डंपरच्या धडकेत मृत्यू, कुटुंबाचा आक्रोश

नंदुरबार :- रमजान ईदच्या दिवशी मित्रांसोबत दर्शनासाठी गेलेल्या २२ वर्षीय तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू झाला. नुकताच त्याचा साखरपुडा झाला होता आणि घरात लग्नाची तयारी सुरू होती. मात्र, अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे कुटुंबावर शोककळा पसरली असून, आई-वडिलांनी हंबरडा फोडला आहे.
ही हृदयद्रावक घटना नंदुरबार जिल्ह्यातील नळगव्हाण फाट्याजवळ सोमवार, ३१ मार्च रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. तळोदा येथील सर्फराज अशफाक शेख (२२) हा मित्रांसह अक्कलकुवा येथे दर्ग्याच्या दर्शनासाठी दुचाकीने (एम.एच ३९ क्यू ०८३३) जात असताना थांबला असता, पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या वाळूच्या डंपरने त्याला चिरडले. या अपघातात सर्फराजचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचे मित्र जाकीर मन्सूरी (२२) आणि शामीन याकूब खाटिक (२४) गंभीर जखमी झाले आहेत.
कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर
सर्फराज याचा नुकताच साखरपुडा झाला होता आणि लवकरच लग्न होणार होते. घरात लग्नाच्या तयारीचा आनंद असतानाच अचानक आलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. जिथे वरात निघायला हवी होती, तिथे अंत्ययात्रा निघाली. आई-वडिलांनी त्याच्या मृतदेहावर अंतिम दर्शन घेताना हंबरडा फोडला, तर संपूर्ण गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
स्थानिकांचा रोष: अवैध वाळू वाहतुकीला जबाबदार धरले
नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू तस्करी सुरू असून, त्यावर प्रशासनाकडून कुठलीही ठोस कारवाई होत नसल्याने स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. भरधाव वाहणाऱ्या या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरमुळे अनेक निष्पापांचे बळी गेले आहेत. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी संबंधित प्रशासन आणि अवैध वाळू तस्करांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे.
पोलीस तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच तळोदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. सर्फराज याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन तळोदा उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले. घटनेनंतर मुस्लिम समाज बांधव मोठ्या प्रमाणावर रुग्णालयात जमा झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी डंपरचालकाविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.